जगाला कुशल मनुष्यबळ पुरविण्याचे आव्हान नागपूर विद्यापीठाने स्वीकारावे – राज्यपाल रमेश बैस

पदवीधरांनी स्टार्टअप निर्मितीत पुढाकार घेवून विकासात योगदान द्यावे

दीक्षांत समारंभात राज्यपालांचे आवाहन

नागपूर :- जगात कौशल्याधारीत मनुष्यबळाची गरज आहे. ही एक संधी मानून जगाची गरज पूर्ण करण्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठाच्या मदतीने कुशल मनुष्यबळ निर्मितीत जग व भारतदेशा दरम्यान दुवा म्हणून कार्य करावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी विद्यापीठाच्या ११० व्या दीक्षांत समारंभात केले. पदवीधरांनी स्टार्टअप निर्मितीत पुढाकार घेवून देश विकासात योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

डॉ.वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ११० वा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात राज्यपाल बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. टी.जी. सिताराम, कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, प्र- कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ.राजू हिवसे, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे आणि विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता मंचावर उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, जग सद्या संक्रमण अवस्थेतून जात आहे. जपान, इटली, जर्मनी, फ्रांस, पोर्तुगाल आदी देशांमध्ये तरुणांची संख्या कमी असल्याने या देशांपुढे कुशल मनुष्यबळाची समस्या निर्माण झाली आहे. उलटपक्षी भारतात २९ वर्षांखालील तरुणांची संख्या मोठया प्रमाणात आहे. अशा स्थितीत जगाची कौशल्याधारीत मनुष्यबळाची गरज भारतदेश भागवू शकतो व येथील तरुणांनाही त्यामुळे मोठया प्रमाणात रोजगार मिळू शकतो. जगातील देशांची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्याकरिता राज्य शासनाच्या कौशल्य विकास विद्यापीठाच्या मदतीने नागपूर विद्यापीठाने कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी जग व भारतदेशा दरम्यान दुवा म्हणून कार्य करावे, असे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.

आपल्या देशात काही कामांना कमी दर्जाचे समजण्यात येते. मात्र, काळानुरुप बदल स्वीकारत ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. पदवीधरांनी कोणतेही काम कमी न लेखता रोजगारासाठी पुढे आले पाहिजे. पदवीधरांनी देश विकासात हातभार लावण्यासाठी स्टार्टअप निर्माते व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. सद्याचे युग हे समन्वयाचे आहे. नागपूर विद्यापीठानेही आपल्या विद्यापीठात दर्जेदार शिक्षण व उत्तमोत्तम उपक्रम राबविण्यासाठी देशातील अन्य सर्वोत्कृष्ठ विद्यापीठांसोबत समन्वयाने कार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. येत्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात येणार आहे. नागपूर विद्यापीठानेही या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करुन अन्य विद्यापीठांसाठी आदर्शवत कार्य करावे, अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राज्यपालांच्या हस्ते डॉ. शुभांगी परांजपे यांना मानवविज्ञान शाखेतील ‘मानवविज्ञान पंडित’ (डी. लिट.) पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील आचार्य पदवी प्राप्त पदवीधर आणि हिवाळी २०२१ व उन्हाळी २०२२ च्या परीक्षांमध्ये विविध विद्याशाखांतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदानाची घोषणा केली व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

डॉ. टी.जी. सिताराम यांनी नागपूर विद्यापीठाने संशोधनकार्य गतीने करण्याचे आवाहन केले. बदलत्या काळात देशातील विद्यापिठांनी अद्यापन पध्दतीत बदल करण्याची गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य मंच उपलब्ध करुन देण्याकडेही लक्ष्य देण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. सिताराम म्हणाले. त्यांनी यावेळी देशातील शैक्षणिक प्रगतीचा आलेख मांडला आणि नवीन शैक्षणिक धोरणांतील महत्वाच्या बाबींही अधोरखित केल्या.

कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषणात विद्यापीठाच्या प्रगतीचा उंचावत गेलेला आलेख मांडत विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांवरही त्यांनी प्रकाश टाकला.

दीक्षांत समारंभाच्या प्रारंभी राज्यपाल, प्रमुख अतिथी, कुलगुरु, प्र-कुलगुरु, विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांच्या मिरवणुकीने सभागृहात प्रवेश केला. राष्ट्रगीत, महाराष्ट्र राज्यगीत आणि विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

नंदीनी सोहोनी ला 7 सुवर्ण पदके

विद्यापीठाच्या हिवाळी २०२१ व उन्हाळी २०२२ परीक्षांमध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या १०८ गुणवंत विद्यार्थ्यांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. टी.जी. सिताराम यांच्या हस्ते पदके व पारितोषिक प्रदान करण्यात आली. यावेळी नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या नंदीनी सोहोनी या विद्यार्थीनीला बी.ए., एल.एल.बी परिक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्ल 7 सुवर्ण पदके व २ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

२८० पदवीधारकांना ‘पीएचडी’

विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या आचार्य अर्थात पीएचडी (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी) पदवी प्राप्त २८० पदवीधरांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेच्या ९७, वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेच्या ३८, मानव विज्ञान विद्या शाखेच्या ११२ आणि आंतर -विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील ३२ पदवीधरांचा समावेश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पती गमाविलेल्या महिलांसाठी 'गंगा भागिरथी' हा निर्णय घाईघाईत ;तात्काळ निर्णय मागे घ्या - खासदार सुप्रिया सुळे

Fri Apr 14 , 2023
मुंबई  :- पती गमाविलेल्या महिलांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी राज्यातील अनेक गावांमध्ये प्रयत्न सुरू असताना, सरकार ‘गंगा भागिरथी’ हा जो काही वेगळा विचार करीत आहे, तो घाईघाईने घेतलेला निर्णय वाटतो त्यामुळे तो तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करुन केली आहे. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधवा महिलांसाठी घेतलेल्या निर्णयावर खासदार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com