– कसबा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर दिली प्रतिक्रिया.
– येत्या विधानसभा निवडणुकीत जनता दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये भाजपला नाकारेल.
नागपूर :- महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. पुण्यातील कसब्यामधून कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले. या निकालानंतर कॉंग्रेसचे नेते माजी आमदार डॉ. आशिष र. देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. दक्षिण-पश्चिम नागपूर हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदार संघ आहे. २०१९मध्ये कॉंग्रेसचे डॉ. आशिष र. देशमुख यांनी याच मतदार संघातून त्यांना लढत दिली होती. कसबा आणि नागपूर शहरातील दक्षिण-पश्चिम मतदारसंघांमध्ये भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती जवळपास सारखीच आहे. कसबा निवडणुकीचा आधार घेत डॉ. देशमुख यांनी त्याच मतदारसंघाचा निकष येथे लावला आहे आणि दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघात येत्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस मोठ्या मताधिक्याने विजयी होईल, असा दावा केला आहे.
“नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातून देवेंद्र फडणवीस आमदार आहेत. २०१९मध्ये मी फडणवीसांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. अटीतटीच्या लढतीत ही जागा भाजपच्या खात्यात गेली. पण आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. पुणे शहरातील कसबा आणि नागपूर शहरातील दक्षिण-पश्चिम मतदारसंघांमध्ये भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती जवळपास सारखीच आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत येथे कॉंग्रेस विजयी होणार आहे. कारण २०१९च्या निवडणुकीत मी फडणवीसांच्या विरोधात लढलो. तेव्हा फडणवीस १ लाखांच्या वर मतांनी निवडून येतील, असे दावे केले जात होते. पण ते ३५ हजारांनीच निवडून आले. फडणवीस मुख्यमंत्री असतांना कॉंग्रेसने त्यांचे मताधिक्य निश्चित कमी केले. तेव्हा मला दक्षिण-पश्चिममध्ये काम करायला केवळ ११ दिवस मिळाले होते. २०२४साठी पक्षाने आदेश दिल्यास विजय नक्की होणार आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत दक्षिण-पश्चिमचा कसबा झाल्याशिवाय राहणार नाही. नागपूर जिल्हा परिषद, नागपूर पदवीधर मतदारसंघ किंवा नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पाहिली तर मागील काही काळापासून नागपूर कॉंग्रेसच्या पाठीशी उभा राहात आहे. येथे संघाचे मुख्यालय आहे आणि उपमुख्यमंत्री दक्षिण-पश्चिमचे आमदार आहेत. पण कॉंग्रेसची पाळंमुळं येथे भक्कम आहेत. ज्या पद्धतीने अत्यंत सुरक्षित मतदार संघ कसबा भाजपच्या हातून गेला, अगदी त्याच पद्धतीने दक्षिण-पश्चिम नागपूर हासुद्धा मतदारसंघ जाणार आहे. कसबासुद्धा भाजपचा बालेकिल्ला होता. तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह जवळपास सर्व मंत्री तळ ठोकून होते. तरीही तेथे त्यांना पराभवाची चव चाखावी लागली. साम, दाम, दंड, भेद सर्व काही करूनही तेथे त्यांना विजय मिळवता आला नाही. महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या हे मुद्दे भाजपला यापुढील प्रत्येक निवडणुकीत भोवणार आहेत. महाराष्ट्रात कॉंग्रेसचे स्थान अढळ आहे आणि भाजप सध्या एकापाठोपाठ चुका करत आहे. त्यामुळे जनता पुन्हा कॉंग्रेसकडे वळणार, यात तीळमात्र शंका नाही. मी असेल किंवा अजून कुणी असेल कॉंग्रेसच्या उमेदवारांना आम्ही सर्व मिळून निवडून आणू. येत्या विधानसभा निवडणुकीत जनता दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात भाजपला नाकारेल. फडणवीस मुख्यमंत्री असतांना मी त्यांच्या विरोधात लढलो. दक्षिण-पश्चिम नागपूर हा भाजपचा गढ मानला जातो. दोन्ही मतदार संघात ब्राम्हण समाजाची सुमारे ३० ते ३५ टक्के मतदार आहेत. ते देखील भाजपवर नाराज आहेत. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघामध्ये आतून खूप खदखद आहे. सामाजिक समीकरणे कॉंग्रेससोबत आहेत. कॉंग्रेस पक्षाने संधी दिली आणि वेळीच सिग्नल दिला तर कामाला लागून चित्र पालटवून दाखवू,” असा विश्वास डॉ. आशिष र. देशमुख यांनी व्यक्त केला.