– मनपा शाळांमध्ये स्मार्ट सिटीद्वारे ६० स्मार्ट क्लासरूम निर्माण
नागपूर :- स्मार्ट सिटी मिशन (SCM) चा भाग म्हणून नागपूरने शहरी सुरक्षा आणि डिजिटल शिक्षण क्षेत्रांमध्ये विशेष प्रगती केली आहे. आयआयएम बंगलोरसारख्या प्रतिष्ठित संस्थांनी केलेल्या सखोल परिणाम मूल्यांकनांनुसार, स्मार्ट तंत्रज्ञान आणि उपाययोजनांनी नागपूरच्या नागरिकांना फायदा झाला आहे. आयआयएम बंगलोरने सादर केलेल्या अहवालानुसार, नागपूरसारख्या स्मार्ट शहरांनी देशाच्या भविष्याच्या रूपरेषेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आयआयएम बंगलोरच्या अहवालानुसार, नागपूरमध्ये निगराणी उपाययोजनांच्या (surveillance measures) अंमलबजावणी नंतर एकूण गुन्हेगारी दरात १४ टक्के घट झाली आहे. नागपूरच्या यशस्वी कार्यप्रणालीने इतर शहरांसाठी शहरी सुरक्षा सुधारण्याची आणि अधिक सुरक्षित, समावेशक सार्वजनिक जागांचा विकास करण्याचा एक आदर्श स्थापित केला आहे.
स्मार्ट सिटी मिशन (SCM) अंतर्गत नोव्हेंबर २०२३ मध्ये “स्मार्ट सिटी मिशन : SAAR – समिक्षा” सिरीज सुरू करण्यात आली होती. या सिरीजमध्ये भारतातील स्मार्ट सिटींवरील विविध थीमवर ५० राष्ट्रीय पातळीवरील परिणाम मूल्यांकन अभ्यास देशातील २९ प्रमुख संस्थांकडून करण्यात आला होता. त्यामध्ये आयआयएम बंगलोर संस्थेने “भारतातील स्मार्ट सिटींमध्ये गुन्हेगारीच्या घटनांवर रिअल-टाइम ट्रॅकिंगचा परिणाम आणि स्मार्ट वर्गखोल्यांद्वारे गुणवत्तेतील सुधारणा” या विषयांवर एक अभ्यास केला.
गुन्हेगारी कमी करण्यासाठी स्मार्ट निगराणी प्रणाली
नागपूर स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NSSCDCL) ने शहरी सुरक्षा क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती साधली आहे. विशेषतः गुन्हेगारी घटनांमध्ये १४ टक्क्यांची घट झाली आहे. आयआयएम बंगलोरच्या मूल्यांकन अभ्यासानुसार, ९३ स्मार्ट सिटींमध्ये ५९,८०२ सीसीटीव्ही कॅमेरे आणि आपत्कालीन कॉल बॉक्सेस स्थापित करण्यात आले आहेत. ज्यामुळे एक सुरक्षित शहरी वातावरण निर्माण झाले आहे. या निगराणी प्रणालींने पोलिस कार्यवाही सोबतच सबळ पुरावा आधारित संपूर्ण देशभरातील पोलिस यंत्रणेला मजबूत केले आहे.
नागपूरने निगराणी उपाययोजनांच्या अंमलबजावणी नंतर एकूण गुन्हेगारी दरात १४ टक्के घट झाली आहे. यामध्ये शहरात ४००० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत आणि यात ‘इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर’ (ICCC) द्वारे रिअल-टाइम मॉनिटरिंग सिस्टमचा समावेश आहे. या योजनेमुळे कायदा अंमलबजावणीला गुन्हे प्रतिबंधित करण्यासाठी मदत झाली आहे. या प्रयत्नांमुळे गेल्या पाच वर्षांत ७००० पेक्षा जास्त गुन्ह्यांचे निराकरण करण्यात मदत झाली आहे. या योजनेमुळे नागपूरमध्ये महिलांमध्ये अधिक सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
शिक्षण क्षेत्रातील स्मार्ट क्लासरूम आणि डिजिटल लायब्ररीचा प्रभाव
नागपूरने आपल्या शैक्षणिक पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी स्मार्ट क्लासरूम आणि डिजिटल लायब्ररीच्या स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. आयआयएम बंगलोरच्या अहवालानुसार, नागपूरने ६ स्मार्ट शाळांमध्ये ६० स्मार्ट क्लासरूमची स्थापना केली आहे,. ज्यामुळे शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता वाढली आहे. या शाळांमध्ये शिक्षण साहित्य मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू या चार विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे. राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासानुसार, ७१ शहरांनी ९,४३३ स्मार्ट क्लासरूमची स्थापना केली आहे. ज्यामुळे सरकारी शाळांमध्ये २२ टक्के पटसंख्या वाढ झाली आहे.
स्मार्ट क्लासरूम व्यतिरिक्त, डिजिटल लायब्ररी विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचे साधन ठरले आहे. जे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षा तयारीसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करतात. नागपूरमध्ये स्मार्ट कार्डमुळे लायब्ररीचा वापर अधिक सुलभ झाला आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुस्तकांची झटपट माहिती मिळवता येते. नागपूर स्मार्ट सिटीने तीन लायब्ररींमध्ये स्मार्ट कार्ड प्रणाली लागू केली आहे. जिथे मुलांसाठी विशेष अध्ययन कक्ष तयार करण्यात आले आहेत.