महाराष्ट्र पोलिस देशात अग्रेसर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी : महाराष्ट्र पोलिस ही देशाची शान आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय सक्षमपणाने गृहमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. राज्यातील पोलिस हे देशात अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरामध्ये पार पडलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रत्नागिरी पोलिस दलाला ‘जिल्हा विकास निधीतून उपलब्ध करुन देण्यात आलेली १० बोलेरो वाहने, २० मोटार सायकल व चार बसेसचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, या वाहनांमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होण्यास निश्चितपणाने मदत होईल. पोलीसांच्या घर निर्मितीला त्याचबरोबर त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील. नैसर्गिक आपत्तीमध्ये पोलिस सक्षमपणाने कार्यरत राहिल्यामुळे नागरिक सुखाची झोप घेऊ शकतात. नागरिकांना पोलिसांची भिती वाटता कामा नये, तर चांगला अनुभव यावा यासाठी त्यांनी कार्यरत रहावे. 55 वर्षावरील वाहतूक पोलिसांना शासनाने बंदोबस्ताबाबत सवलत दिली आहे. पोलिसांना अनेक वेळेला आनंदाचे क्षण त्यांच्या कुटुंबियासोबत घालवयाचे असतात तथापि कार्यबहुलतेमुळे त्यांना ते शक्य होत नाही. गडचिरोलीचा पालकमंत्री म्हणून कार्यरत असताना पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली असल्याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली.

याप्रसंगी पोलिस दलासाठी घेण्यात आलेल्या वाहनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

यावेळी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, रत्नागिरी विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्यासह पोलिस दलातील इतर अधिकाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते.

NewsToday24x7

Next Post

“शासन आपल्या दारी” योजनेतून जिल्ह्यातील एक लाख लाभार्थ्यांना लाभ देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Fri May 26 , 2023
रत्नागिरी  :- “शासन आपल्या दारी” या योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील किमान एक लाख लाभार्थ्यांना शासन योजनेचा लाभ प्रत्यक्ष स्वरूपात देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील “शासन आपल्या दारी” या लोकाभिमुख योजनेच्या शुभारंभाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com