नागपूर :- आजची पिढी मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी जात आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ‘नागपूर नशामुक्त ’मोहीम लवकरच राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
नार्को कोऑर्डिनशन सेंटरबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक विजय माहूरकर, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, डॉ. आसिफ इनामदार, एलसीबीचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यावेळी उपस्थित होते.
हिमांचल, पंजाब व ओरिसा राज्याच्या धर्तीवर नागपूर नशामुक्त मोहिम राबविण्यासाठी ॲक्शन प्लॉन तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी देवून यामध्ये आरोग्य, समाजकल्याण, आदिवासी, शिक्षण विभागाचा समावेश करावा, असे ते म्हणाले. शाळा, महाविद्यालयात व्हिडीओद्वारे याविषयी जनजागृतीसाठी एनजीओंना सहकार्य घ्या. विद्यार्थ्यांच्या पालकांचे सुध्दा समुपदेशन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.