– अमृत महोत्सवी वर्षात मनपाचे पदार्पण
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचा 74 वा स्थापना दिवस रविवारी 2 मार्च 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिका 74 वर्ष पूर्ण करुन 75 व्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. शहरातील नागरिकांसाठी अभिमानाचा दिवस आहे.
मनपा स्थापनेच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे रविवारी 2 मार्च रोजी मनपा मुख्यालयामध्ये आयोजन करण्यात आले आहे. नागपूरच्या नागरिकांच्या सेवेत ‘पौर जन हिताय’ हा ब्रीद वाक्य घेऊन अहोरात्री काम करणाऱ्या महापालिकेने महत्वाचा टप्पा आज गाठला आहे.
मनपा मुख्यालयातील हिरवळीवर रविवारी सकाळी 9.30 वाजता मनपा स्थापना दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी हे राहतील. मुख्य अतिथी म्हणून अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांची उपस्थिती असेल.
नागपूर महापालिकेची स्थापना 2 मार्च 1951 रोजी करण्यात आली होती. त्या वेळेस शासनाने प्रशासक म्हणून जी जी देसाई यांची नियुक्ती केली होती. त्यांच्या मार्गदर्शनात जुन 1952 मध्ये महापालिकेची निवडणूक झाली आणि बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांना प्रथम महापौर होण्याचा मान मिळाला. तर छोटेलाल माधव ठक्कर हे पहिले उपमहापौर, सदु दंडिगे हे स्थायी समितीचे सर्वप्रथम अध्यक्ष म्हणून विराजमान झाले.
बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी राज्यात मोठ्या पदावर काम केले. आणि त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम त्यांच्या नावाने आहे. नागपूरचे तत्कालीन नगरसेवक एम. हिदायतुल्ला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि देशाचे उपराष्ट्रपती होते. तसेच तत्कालीन आयुक्त पी.जी. गवई हे दिल्लीचे नायब राज्यपाल होते. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा नागपूर नगरीचे दोनदा महापौर राहिले आहे. तसेच अनेक नगरसेवक हे आमदार, खासदार व इतर महत्वाच्या पदावर राहिले आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात आतापर्यंत 54 महापौरांनी महापालिकेला सेवा दिली तसेच 51 आयुक्तांनी महापालिकेची प्रशासकीय धुरा सांभाळली. महाराष्ट्रात नागपुरला उपराजधानीचा दर्जा प्राप्त झाला असून नागपूर शहरासाठी अगोदर वऱ्हाड मध्य प्रांत कायदा (सी.एन.सी.ॲक्ट 1948) अंमलात होता. आता राज्य शासनाच्या आदेशान्वये संपूर्ण राज्यात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम लागू करण्यात आला आहे.
नागपूर महापालिकेत आयुक्त म्हणून काम करणारे जे एस सहारिया आणि मनू कुमार श्रीवास्तव यांना राज्याचे मुख्य सचिव पदावर काम करण्याचा मान प्राप्त झाला आहे. तसेच इतर आयुक्त झालेले अधिकारी वेगवेगळ्या पदावर राज्य शासनात काम करीत आहे. 75 वर्ष पूर्वीचे नागपूर आणि आजच्या नागपूर शहरात आमूलाग्र परिवर्तन पहायला मिळत आहे. एकेकाळी महाल आणि सीताबर्डीपर्यंत असलेला शहर आता 227 वर्ग किलोमीटर पर्यंत विस्तारीत झाला आहे. नागपूर महानगरपालिका तयार होत असताना शेजारची 34 खेडी नागपुरात विलीन करण्यात आली. आता हुडकेश्वर आणि नरसाळा यांचे समावेश करण्यात आला असल्याने आजचे विशाल नागपूर दिसत आहे.