नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक, उद्या मतमोजणी ; प्रशासनाची सज्जता

काटेकोरपणे मतमोजणी पार पाडा-निवडणूक निरिक्षक अरुण उन्हाळे

नागपूर : विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीची मतमोजणी उदया सकाळी ८ वा. अजनी येथील समुदाय भवनात सुरु होणार आहे. निवडणूक निरिक्षक अरुण उन्हाळे यांनी बुधवारी मतमोजणीबाबत आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत काटेकोरपणे मतमोजणी पार पाडण्याचे आवाहन पर्यवेक्षकांना केले.

विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या एका जागेसाठी २२ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. ३० जानेवारी २०२३ रोजी पार पडलेल्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया चोखपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाची पूर्ण सज्जता झाली आहे. यासंदर्भात अजनी येथील मतमोजणी केंद्रावर निवडणूक निरिक्षक अरुण उन्हाळे आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.

नागपूरचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मिना, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गोवडा, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आणि उपायुक्त तथा सहायक निवडणूक अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक उपस्थित होते.

या प्रशिक्षण कार्यशाळेत उन्हाळे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले, नागपूर शिक्षक मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. त्याचप्रमाणे मतमोजणीची प्रक्रियाही शांततेत व काटेकोरपणे पार पाडावी. प्रत्यक्ष मतमोजणी करतांना उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन काटेकोरपणे प्रक्रिया पार पाडण्याचे आवाहनही त्यांनी केले. डॉ. बिदरी यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील अपर जिल्हाधिकारी निशिकांत सुके यांनी मतमोजणी प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. मतमोजणी प्रक्रिया राबविताना पाळावयाचे भारत निवडणूक आयोगाचे नियम, मतमोजणीच्या विविध फेऱ्यांदरम्यान घ्यावयाची काळजी आदिंविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. मतमोजणीचे प्रात्याक्षिकही करण्यात आले.

सकाळी ८ वा. पासून सुरु होणार मतमोजणी

अजनी येथील मेडीकल रोडवर स्थित समुदाय भवनात २ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वा. मतपेट्या बंद केलेली स्ट्राँगरुम बंदोबस्तात इनकॅमेरा उघडण्यात येईल. प्रत्यक्ष मतमोजणीस सकाळी ८ वा. सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ.विजयलक्ष्मी बिदरी मतमोजणी केंद्रावर उपस्थित मतमोजणी पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक, अधिकारी-कर्मचारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी आदिंना गोपणीयतेची शपथ देतील..

एकूण २८ टेबलवर मतमोजणी

स्ट्राँगरुममधून बाहेर काढण्यात आलेल्या मतपेट्यांतील मतपत्रिका मिक्सिंग ड्रममध्ये एकत्र करण्यात येतील व त्यांनतर प्रत्येक टेबलवर १ हजार मतपत्रिका याप्रमाणे मतमोजणीस सुरुवात होईल. यावेळी उमेदवार व प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. सर्वप्रथम अवैध मतांना वेगळे केले जाईल.

रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु राहण्याची शक्यता

या मतदान प्रक्रियेत बॅलेट पेपर वापरण्यात आले आहेत. २२ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.तसेच पसंतीक्रमानुसार मतमोजणी होत आहे. पसंती क्रमांक असल्यामुळे पहिल्या पसंतीची मते यावर निकालाचे सर्व गणित अवलंबून असल्यामुळे पमतमोजणीची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण होण्यास उशिर होण्याची व एकंदरीतच रात्री उशिरापर्यंत मतमोजणी प्रक्रिया सुरु राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मोबाईल प्रतिबंधीत,प्रवेशिकाधारकांनाच प्रवेश

या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या कर्मचारी तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी उमेदवार या सर्वांना प्रवेशिका देण्यात आल्या आहेत त्या प्रवेशिकांशिवाय कोणालाही आत मध्ये परवानगी मिळणार नाही. या परिसरात मोबाईल वापरण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधिंसाठी माध्यम कक्ष उभारण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून प्राधिकार पत्र (प्रवेशिका) प्राप्त माध्यम प्रतिनिधींनाच येथे प्रवेश असणार आहे. साध्या ओळखपत्रावर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

मतमोजणी केंद्रावर मोबाईल प्रतिबंधीत, प्रवेशिकाधारकांनाच प्रवेश

मतमोजणी केंद्रावर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधिंसाठी माध्यम कक्ष उभारण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून प्राधिकार पत्र (प्रवेशिका) प्राप्त माध्यम प्रतिनिधींनाच येथे प्रवेश असणार आहे. मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल, कोणतेही इलेक्ट्रीक उपकरण, कॅमेरा, पेन कॅमेरा घेवून जाण्यास पूर्णपणे बंदी आहे. मतमोजणी करिता उपस्थित राहणारे उमेदवार व त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांची वाहन व्यवस्था मतमोजणी केंद्र परिसरात करण्यात आली आहे. तर उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींची वाहन व्यवस्था मतमोजणी केंद्रापासून ३०० मिटर अंतरावरील फुटबॉल मैदानावर करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे . उमेदवारांच्या प्रतिनिधीसाठी या परिसरातच माफक दरात खानपानाची, जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. गरजेनुसार याचा लाभ घेण्याबाबतही पत्रकात कळविण्यात आले आहे.

मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर आयोगाच्या परवानगीने विजयी उमेदवार घोषित होऊन त्यास निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त यांच्याहस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ४ फेब्रुवारी २०२३ रोजी संपणार आहे.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक,प्रारंभिक मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात

Thu Feb 2 , 2023
नागपूर शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक,प्रारंभिक मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात.निवडणूक निरिक्षक अरूण उन्हाळे, निवडणूक अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी उपस्थित. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com