माझी विकासकामांची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 

– ‘संकल्प विदर्भाचा’ कार्यक्रमात मुलाखत

नागपूर :- मी लोकांना समाधान आणि आनंद मिळेल, अशी कामे करत असतो. समस्या ओळखून त्या सोडविण्यावर माझा भर असतो. त्यामुळे नागपूर शहरासह संपूर्ण देशामध्ये भविष्यात कोणती विकासकामे करायची आहेत, याबद्दलची माझी ब्लू प्रिंट तयार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये आयोजित ‘संकल्प विदर्भाचा’ या कार्यक्रमांतर्गत आज (शुक्रवारी) आयोजित करण्यात आलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. नितीन गडकरी म्हणाले, ‘कुठलेही काम करायचे असेल तर त्याची संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागते. माझी कामाची पद्धत तशीच आहे. मी कामाची जबाबदारी घेतली की त्याच्याशी समरस होतो. त्यामुळेच त्याच्याशी संबंधित प्रत्येक छोटी गोष्ट माझ्या लक्षात असते.’ माझ्या खात्यामार्फत होणारी कामे कितीही मोठ्या ठेकेदारांकडे असली तरी कामाचा दर्जा तपासण्यात आणि त्याचे सूक्ष्म निरीक्षण करण्यात मी कसर सोडत नाही, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. मिहानच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर गडकरी म्हणाले, ‘आमचे सरकार असताना आम्ही मिहान प्रकल्प आणला. त्यानंतर सरकार गेले आणि कामाची गती मंदावली. आता गेल्या नऊ वर्षांमध्ये मिहानच्या कामाला आम्ही पुन्हा एकदा गती दिली आहे. त्यानंतर मिहानमध्ये अनेक मोठ्या कंपन्या आल्या. आयआयएम, एम्स सुद्धा झाले. मिहानमधील रस्ते चांगले झाले. मोठ्या प्रमाणात रोजगार सुद्धा निर्माण झाला.’ ‘न्यूज नेशन’ वाहिनीच्या ‘न्यूज स्टेज महाराष्ट्र व गोवा’ यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

‘लोकांना राजकारणात रस नाही’

‘विदर्भात एवढी वर्षे जी कामे होऊ शकली नाहीत, ती आम्ही नऊ वर्षांमध्ये केली आहेत. सर्वसामान्य लोकांना राजकारणात रस नाही. त्यांना चांगले काम हवे आहे. दैनंदिन जीवनातील समस्या सुटणेच त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आम्ही त्यावरच लक्ष केंद्रित केले आहे,’ असेही नितीन गडकरी म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बिडगाव ग्रामपंचायत वर प्रशासनाविरोधात धडक मोर्चा

Fri Jun 30 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- जिल्हा वार्षिक योजना (नागरी सुविधा जनसुविधा) अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास, 20% सेस फंड ई. योजनांच्या माध्यमातून महिला व बालकल्याण समिती जि.प. नागपुरच्या प्रा अवंतिका लेकुरवाडे व कामठी पंचायत समितीचे माजी उपसभापती आशिष मल्लेवार यांच्या विशेष प्रयत्नाने बिडगावला विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून दिला. सदर निधी हा मार्च 2023 ला मंजूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com