नागपूर :- नागपूर शहरातील दिव्यांग खेळाडूंकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे महत्वाची अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे. राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या प्रोत्साहनाकरिता सुरू असलेल्या या योजनेचा जास्तीत जास्त खेळाडूंना लाभ मिळावा यादृष्टीने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात समाजविकास विभागाद्वारे लक्ष दिले जात आहे.
राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना आर्थिक सहाय्य मनपाच्या या योजनेतून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दोन दिव्यांग खेळाडूंना प्रत्येकी ३ लाख याप्रमाणे ६ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. तसेच प्रवास खर्च, प्रवेश शुल्क , निवास व भोजन इत्यादी साठी एका दिव्यांग खेळाडुला 20,000/- आर्थिक सहाय्य देण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंप्रमाणेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी देखील नागपूर महानगरपालिकेच्या या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
मनपाच्या समाज विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना आर्थिक सहाय्य या योजनेच्या माध्यमातून अधिकृत राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागासाठी पात्र होणाऱ्या खेळाडूंना प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन इत्यादीसाठी खर्च कमाल १५ हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते तर अधिकृत राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेमध्ये सहभागासाठी पात्र होणाऱ्या खेळाडूंना प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन इत्यादीसाठी खर्च कमाल २५ हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच अधिकृत अंतरराष्ट्रीय स्तरीय स्पर्धेमध्ये सहभागासाठी पात्र होणाऱ्या खेळाडूंना प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन इत्यादीसाठी खर्च कमाल १ लाख रुपये आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येते. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी खेळाडूंची कामगिरी लक्षात घेऊन त्यांना फक्त एकाचवेळी प्रशिक्षण, साहित्य खरेदी, मार्गदर्शक शुल्क इत्यादीसाठी ३ लाख रुपये प्रत्यक्ष व कमाल मर्यादेपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येते. या बाबतची माहिती समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रजंना लाडे यांनी दिली.