– नोंदणीसाठी कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक
– सुरु होणार फिरते नोंदणी केंद्र
चंद्रपूर :- मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरीकांच्या सुविधेसाठी चंद्रपूर मनपातर्फे नोंदणी शिबीरे आयोजीत करण्यात आली असुन यातील पहिले शिबीर ८ ऑगस्ट रोजी रामनगर येथील ज्येष्ठ नागरीक संघ येथे दुपारी ४ वाजता होणार असुन शिबिरात येणाऱ्या नागरीकांनी नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगण्याचे आवाहन मनपाने केले आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून ६५ वर्ष व त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरित करण्यात येणार आहे.जे नागरिक श्रावण बाळ योजना,संजय गांधी निराधार योजनेस पात्र आहेत ते या योजनेस सुद्धा पात्र असणार आहेत.
या शिबिरांमध्ये योजनेची माहिती देण्याबरोबरच चंद्रपूर मनपाद्वारे विकसित vayoshree.cmcchandrapur.com या पोर्टलद्वारे पात्र अर्जदाराचे अर्ज स्वीकारले जाणार असुन नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली जाणार आहे. आवश्यक उपकरण घेण्यास लागणारी वैद्यकीय अधिकाऱ्यांची मान्यताही अर्जदारास शिबिरातच मिळु शकणार आहे. ८ ऑगस्ट दुपारी ४ वाजता रामनगर ज्येष्ठ नागरीक संघ,१२ ऑगस्ट रोजी स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरीक संघ तुकूम व १६ ऑगस्ट रोजी चैतन्य ज्येष्ठ नागरीक संघ तुकूम येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
मनपाचे मुख्य कार्यालय,झोन कार्यालये, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय तसेच ७ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात वयोश्री योजना नोंदणी सुरु असुन जे नागरीक मनपाच्या नोंदणी स्थळी वैद्यकीय त्रासामुळे येऊ शकत नाही त्यांच्यासाठी फिरते नोंदणी केंद्र सुरु करण्यात येत आहे. ६५ वर्षावरील सर्व नागरिकांनी आयोजीत शिबिरांद्वारे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
पात्रतेचे निकष :
१. राज्यातील ज्येष्ठ नागरिक दि. ३१.१२.२०२३ अखेर पर्यंत वयाची ६५ वर्ष पूर्ण केली असावी.
२. लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य/ केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेंशन योजने अंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन पुरावा सादर करु शकतो.
३. उत्पन्न मर्यादा रु. २,००,०००/- आत
४. सदर व्यक्तीने मागील ३ वर्षात शासनाद्वारे कोणतेही लाभ न घेतल्याचे घोषणा पत्र
५. लाभार्थ्यांच्या खात्यात ३,०००/- थेट लाभ झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत विहित केलेली उपकरण खरेदी करण्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहील
६. निवड/निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येकी ३० टक्के महिला राहतील.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्र :
१. आधार कार्ड/मतदान कार्ड
२. राष्ट्रीय बँकेची पासबुक झेराक्स
३. पासपोर्ट आकाराचे २ फोटो
४. उपकरण/साहित्याचे (दुबार लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र )
५. उत्पनाचे स्वयंघोषणा पत्र
६. राशनकार्ड (पिवळी / केशरी)
७. जन्मतारखेचा पुरावा
८. ज्या साहित्याची आवश्यकता आहे त्यासाठी शासकीय किंवा मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून विहित नमुन्यात प्रमाणपत्र लाभार्थ्यांना घ्यावे लागणार आहे.
कोणते साहित्य खरेदी करता येणार ?
१. चष्मा
२. श्रवणयंत्र
३. ट्रायपॉड
४. स्टिक
५. व्हील चेअर
६. फोल्डिंग वॉकर
७. कमोड खुर्ची
८. नि-ब्रेस
९. लंबर बेल्ट
१०. सर्व्हायकल कॉलर, याव्यतिरिक्त इतर साहीत्य हवे असल्यास खरेदी करता येईल.