– कोर्ल्ड वार्ड, रुग्णवाहिका, ग्रीन नेट, पाणपोईसह मजूरांना दुपारी सुट्टी, दिवसभर उद्याने सुरू
नागपूर :- नागपूरसह देशात विविध ठिकाणी तापमान वाढत आहे. नागपूरमध्ये सुद्धा ४५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. वाढत्या तापमानामुळे उद्भवत असलेल्या उष्माघाताच्या धोक्यापासून बचावासाठी नागपूर नागपूर महानगरपालिकेची यंत्रणा विविध टप्प्यांवर कार्यरत आहे.
शहरातील ९ शासकीय आणि मनपा रुग्णालयांमध्ये ‘कोल्ड वॉर्ड’ची निर्मिती करण्यात आली असून सध्या ५ रुग्ण कोल्ड वार्ड मध्ये दाखल आहे. नागरिकांसाठी मनपाची उद्याने दुपारीही सुरूच ठेवण्यात येत आहेत. नागरिक देखील दिवसभर सुरू असलेल्या उद्यानांमध्ये सावलीचा आसरा घेत घेत आहे. मनपातर्फे सर्व बांधकाम मजुरांना दुपारची सुट्टी देण्याचे आदेश निर्गमित झाले असून त्याचे पालन सुद्धा करण्यात येत आहे. मनपाच्या समाज विकास विभागातर्फे शहरातील वाढते तापमान लक्षात घेता बेघर नागरिकांचे सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत समाज विकास विभागामार्फत शहरातील विविध भागात बेघरांचा शोध घेउन त्यांना निवारा केंद्रात आश्रय देण्यात आलेला आहे. एप्रित 2024 पासून आतापर्यंत 111 पेक्षा जास्त बेघर नागरिकांना निवारा केंद्रात आश्रय देण्यात आला. सध्यस्थितीत सर्व सहा बेघर निवारा केंद्रात एकुण 354 नागरिक राहात आहेत.
नागपूर महानगरपालिकेद्वारे उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. शहरातील मेडिकल, मेयो, डागा तसेच मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालय, आयसोलेशल हॉस्पिटल आणि पाचपावली रुग्णालय यासह ईएसआयएस रुग्णालय, आयुर्वेदिक हॉस्पिटल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथे ‘कोल्ड वार्ड’ तयार करण्यात आले आहेत. तसेच सर्व रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. याशिवाय शहरातील सिग्नलवर ग्रीन नेट लावण्यात आलेल्या आहेत. मनपाची १६३ उद्याने दुपारच्या वेळेत सुरू ठेवण्यात येत आहेत तर ३५०च्या वर ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली. वाहतूक पोलिस विभागाद्वारे दुपारच्या वेळी सिग्नल बंद ठेवण्यात आले. १०८ क्रमांकाच्या ११ आणि मनपाच्या ७ रुग्णवाहिका २४ तास तत्पर असल्याची माहिती डॉ. नवखरे यांनी सादर केली.
शहरातील रस्ते, बाजार, बसस्थानक इत्यादी किंवा कुठेही बेघर व्यक्ति ज्यांना आश्रय किंवा निवारा केंद्राची आवश्यकता आहे. त्याकरीता 9960183143, 9930327532 या क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन महानगर पालिका समाज विकास विभागातर्फे डॉ. रंजना लाडे यांनी केले आहे. महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या अधिनस्त शहरात सहा ठिकाणी बेघर निवारा केंद्र सुरु असून त्यामुळे बेघर नागरिकांची सोय झाली आहे.
ही काळजी घ्या
नागरिकांनी कामाशिवाय उन्हात निघायचे टाळावे. उन्हात जाण्याचे वेळ आल्यास योग्य खबरदारी घेतली जावी. उन्हाच्या वेळेत बाहेर फिरणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, स्वत:सह इतरांच्याही तब्येतीची काळजी घ्यावी, हलकी, पातळ व सच्छिद्र कपडे वापरावीत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा हॅट, बूट किंवा चप्पलचा वापर करावा, प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी, उन्हात काम करताना हॅट किंवा छत्रीचा वापर करावा. ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकणे, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस., लिंबूपाणी, ताक आदी पेय नियमीत पिणे, घर थंड ठेवण्यासाठी ओलसर पडदे, पंखा, कुलर आदींचा वापर करावा.
उष्माघात टाळण्यासाठी उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे, उन्हात कष्टाची कामे करणे टाळा, लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका, गडद, घट्ट व जाड कपडे परिधान करणे टाळावे, उन्हात स्वयंपाक करणे टाळावे, स्वयंपाक करताना स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत, मद्य, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंक्स ही पेय टाळावी, शिळे आणि उच्च प्रथिने असलेले अन्न खाणे टाळावे.