– रात्रीच्या वाढत्या थंडी बेघरांसाठी सहा निवारागृहांची व्यवस्था
नागपूर :- शहरातील थंडी वाढत चालली असून, रस्त्यावरील बेघरांना नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे मदतीचा हात देत आसरा दिला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निवारा चमूने 4 डिसेंबरच्या रात्री विशेष मोहीम राबवित मिठा नीम दर्गा, संविधान चौक, सदर, गड्डी गोदाम आणि इंदोरा येथे थंडीच्या वातावरणात रस्त्यावर वास्तव्यास असलेल्या बेघर व्यक्तींना मदतीचा आसरा दिला आहे. यातील १३ बेघर व्यक्तींना नागपूर पोलिसांच्या सहायाने इंदोरा निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे.
शहरात रात्रीला विविध रस्त्यावर, फुटपाथवर, रस्त्याच्या कडेला, बंद दुकानाच्या खाली झोपणारे अनेक बेघर व्यक्ती थंडीत कुडकुडत झोपलेले दिसून येतात. त्यांच्याप्रती प्रत्येकाच्या मनात सहानुभूतीची भावना निर्माण होते. अशा रस्त्यांवर राहणाऱ्या बेघरांसाठी मनपा समाज कल्याण विभागाने मदतीचा हात पुढे केला आहे. रात्रीच्या वाढत्या थंडी बेघरांसाठी निवारागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात तसेच नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, समाज विकास विभागाचे उपायुक्त विशाल वाघ आणि समाज कल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे यांच्या नेतृत्वात समाज विकास विभागाचे कर्मचारी, बेघर निवारा केंद्राचे कर्मचारी कार्य करीत आहे.
नागपूर महानगरपालिका दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे गरीब व गरजू बेघरांसाठी मूलभूत सोयी सुविधा बेड, ब्लॅंकेट, गरम पाणी व शौचालयाच आदि सोय उपलब्ध असून २५० बेडची क्षमता असलेले बेघर निवारे असून, २५ बेड महिलांसाठी आरक्षित आहेत. येथे ६० वर्षावरील वृद्धांना व अपंगांना मोफत भोजन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येते. सध्या सहा शहरी बेघर निवाऱ्यात २२५ लोक वास्तव्यास आहेत.
नागपूर महानगरपालिकाकडून सहा शहरी बेघर निवारे चालविण्यात येतात. यात आधार शहरी बेघर निवारा मनपा बुटी कन्या शाळा, टेम्पल बाजार रोड सीताबर्डी, बोधिसत्व शहरी बेघर निवारा केंद्र इंदोरा. सावली शहरी बेघर निवारा केंद्र हंसापुरी, आश्रय शहरी बेघर निवारा केंद्र सतरंजीपुरा झोन जुनी इमारत, आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र समानभवन इंदोरा मठ मोहल्ला, आस्था बेघर बेघर पुनर्वसन शेल्टर, घाट रोड ठिकाणी बेघर निवारा केंद्र आहेत. निवाऱ्यामध्ये नियमित आरोग्य तपासणी करण्यात येते व प्रवेशासाठी कागदपत्रांची गरज नसते.
वाढत्या थंडीच्या पाश्वभूमीवर मनपा बेघर निवारा चमुद्वारे विशेष शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत शहरातील विविध भागातून रस्त्यावर राहणाऱ्या आणि फुटपाथवर झोपणाऱ्या बेघरांना शोधून निवारा केंद्रात नेण्यात येत आहे. शहरात आवश्यकतेनुसार ५० महिलांचे आणि मोहन नगर येथे १०० बेघरांचे शेल्टर सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे.सामाजिक संघटना, दानशूर व्यक्तींनी शहरातील बेघर व्यक्तीसाठी भोजन, ब्लॅंकेट आदी वाटप न करता, निवाऱ्यातील बेघरांना द्यावे व बेघर नागरिकांना शेल्टर होममध्ये पाठविण्यास मदत करावी, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
मदतीसाठी संपर्क क्रमांक :
आधार शहरी बेघर निवारा मनपा बुटी कन्या शाळा, टेम्पल बाजार रोड सीताबर्डी, : 9119572519
बोधिसत्व शहरी बेघर निवारा केंद्र इंदोरा: 9595081033
सावली शहरी बेघर निवारा केंद्र हंसापुरी: 9049752690
आश्रय शहरी बेघर निवारा केंद्र सतरंजीपुरा झोन जुनी इमारत :7620964072
आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र समानभवन इंदोरा मठ मोहल्ला : 8237126345
आस्था बेघर बेघर पुनर्वसन शेल्टर, घाट रोड : 9860998972