– वीटाभट्टी, झोपडपट्टी, पूलाखालील बालकांचे लसीकरण
नागपूर :- बाळ जन्माला आल्यानंतर ते वयाची १६ वर्षे पूर्ण करेपर्यंत त्याचे विविध प्रकारच्या आजारांच्या प्रतिबंधासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. अशा लसीकरणासाठी मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच नागरी आरोग्य मंदिरांमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणेपर्यंत येउ न शकणा-या समुदायातील बालके लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात फिरते लसीकरण केंद्राद्वारे लसीकरणाला गती देण्यात आलेली आहे.
नागपूर महानगरपालिकेद्वारे बालकांना बीसीजी, ओपीव्ही, रोटा, पीसीव्ही, आयपीव्ही, एमआर, डीपीटी, टीडी अशा विविध लस देण्यात येतात. हेपटायटीस बी, पोलिओ, क्षयरोग, घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, गोवर, रुबेला, न्यूमकोकल, रोटावायरस या हानिकारक रोगांपासून बालकांचे संरक्षण व्हावे व त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी याकरिता हे लसीकरण करण्यात येते. लसीकरण हा प्रत्येक बालकाचा हक्क असून त्यापासून कुणीही वंचित राहू नये याकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे फिरते लसीकरण केंद्र अर्थात मोबाईल लसीकरण वाहन प्रत्येक झोनमध्ये कार्यान्वित करण्यात आले आहे. हे वाहन शहरातील वीटाभट्टी, झोपडपट्टी, पूलाखाली व बांधकाम स्थळे अशा विविध ठिकाणी जाउन येथील बालकांचे लसीकरण करीत आहे. आरसीएच अधिकारी डॉ. सरला लाड, झोनल वैद्यकीय अधिकारी व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी यांच्या चमूद्वारे फिरते लसीकरण केंद्राद्वारे वर्षभरात २१०४ बालकांचे विविध प्रकारचे लसीकरण करण्यात आले आहे. या अभियानाला अधिक गती देउन लसीकरणापासून वंचित राहणा-या जास्तीत जास्त बालकांचे लसीकरण वेळेत करण्याबाबत दक्ष राहण्याचे निर्देश मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिले आहे.
मनपाच्या फिरते लसीकरण केंद्राद्वारे बालकांचेच नाही तर गरोदर मातांचे देखील लसीकरण करण्यात येते. झोनस्तरावरील वैद्यकीय चमू अशा ठिकाणी जाउन बालक आणि मातांचे आवश्यक लसीकरण करून घेते. मोबाईल लसीकरण वाहनांद्वारे जोखीमग्रस्त भागातील बालकांचे वेळेवर सहजपणे लसीकरण शक्य झाले आहे.