नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे विधी अधिकारी व्यंकटेश कपले आपल्या ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवे नंतर मंगळवारी ३१ जानेवारी रोजी मनपाच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निवृत्ती समारंभात मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, रवींद्र भेलावे, मिलिंद मेश्राम, अधिवक्ता सुधीर पुराणिक यांच्यासह लक्ष्मी व्यंकटेश कपले प्रामुख्याने उपस्थित होत्या.
कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी विधी अधिकारी कपले यांचा शाल, श्रीफळ, पुष्प गुच्छ आणि मानचिन्ह देऊन सत्कार केले. याप्रसंगी राधाकृष्णन बी यांनी सांगितले की, मनपा सेवेत राहून कपले यांनी सर्व विभागांना विधी संबंधित कार्याची मदत केली आहे. त्यांचा मनमिळावू स्वभाव, खेळाडू वृत्ती आणि विधी संदर्भात असलेल्या माहितीचा मनपाला मोठा लाभ झाला आहे. असे सांगत आयुक्तांनी कपले यांना दीर्घ आयु लाभो अशा शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बोलतांना कपले यांनी सांगितले की, त्यांचा कार्यकाळात प्रलंबित केसेस मध्ये मोठी घट झाली. अगोदर ७-८ हजार केसेस प्रलंबित होत्या. आता ती संख्या ३-४ हजारावर आली आहे. तसेच मनपाला ८५ टक्के केसेस मध्ये यश मिळाले आहे. त्यांनी सांगितले की, मनपाच्या सर्व अधिकाऱ्यांचे, पदाधिकाऱ्यांचे विधी विभागाला मोठा सहकार्य मिळत आहे. विधी विभागाचे आपल्या सहकार्यांबद्दल सुद्धा त्यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक विधी अधिकारी प्रकाश बरडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक विधी अधिकारी सुरज पारोचे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सहायक विधी अधिकारी आनंद शेंडे, यांनी केले. कार्यक्रमादरम्यान विधी विभागाकडून कपले यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विधी सल्लागार सर्वश्री नंदेश देशपांडे, जेमिनी कासट, सचिन नारळे आणि सहाय्यक विधी अधिकारी अजय माटे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.