– शहरातील १५ उद्यानांमध्ये ‘पुष्पोत्सव’ प्रदर्शनी : शंभरावर प्रजातींची फुले पाहण्याची अनोखी संधी
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ‘पुष्पोत्सव’ प्रदर्शनाचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात उदघाटन झाले. मनपा आयुक्तांनी शनिवारी (ता.२५) त्रिमूर्ती नगर येथील राजीव गांधी ‘ग्लो गार्डन’ येथे ‘पुष्पोत्सव २०२५’चे शुभारंभ केले.
यावेळी उपायुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त (उद्यान) गणेश राठोड, कार्यकारी अभियंता (विद्युत) राजेंद्र राठोड, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, संदीप लोखंडे, उद्यान कंत्राटदार विनोद आष्टीकर आदी उपस्थित होते.
राजीव गांधी ‘ग्लो गार्डन’ येथे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
२ फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या पुष्पोत्सवाला शहरातील मान्यवर देखील भेट देणार आहेत. भारतमाता उद्यान येथे आमदार प्रवीण दटके, लता मंगेशकर उद्यान येथे आमदार कृष्णा खोपडे, शंकर नगर उद्यान येथे आमदार विकास ठाकरे, पाटणकर उद्यान येथे आमदार डॉ. नितीन राऊत, त्रिशताब्दी उद्यान येथे आमदार मोहन मते हे भेट देणार आहेत.
पुष्पोत्सवानिमित्त उद्यानांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मनपाच्या पुष्पोत्सव प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष आहे. शहरातील दहाही झोन अंतर्गत १५ विविध उद्यानांमध्ये २ फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे. पुष्पोत्सव प्रदर्शनात झेंडू, पिटोनिया, डायनथस, देहेलिया, गुलाब, जर्बेरा, कॅलेंडुला, प्लँटेला, झिनिया शेवंती, अँटीरियम, पाम, अरेलिया, युकोरबिया, डेसिना, जत्रोफा, पेंटास, गुलाब, बिगोनिया यासारखे १०० हून अधिक सीजनल व पेरॅनियल फुलांचे प्रकार व विभिन्न प्रजातींची फुले, औषधी वनस्पतीची झाडे एकाच ठिकाणी प्रत्यक्ष पहायला मिळत आहेत. याशिवाय फुलांच्या आकर्षक कलाकृती देखील लक्ष वेधून घेत आहेत. या फुलांच्या संदर्भात सविस्तर माहिती देखील तज्ज्ञांमार्फत नागरिकांना दिली जात आहे. तरी नागरिकांनी पुष्पोत्सव २०२५’ ला भेट द्यावी असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे. यावेळी उद्यानात आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती. रोषणाईने नागरिकांचे लक्ष वेधले.
यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, गतवर्षी लता मंगेशकर उद्यानात पुष्पोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुष्पोत्सवामध्ये नागरीकांना विविध फुलांच्या प्रजातीची माहिती होते. यामुळे नागरिकांचा उत्साह वाढतो. जास्तीत जास्तीत जास्त नागरिकांनी या पुष्पोत्सवाला भेट देऊन लाभ घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनीही नागपूर महानगरपालिकातर्फे सुंदर अशा पुष्पोत्सवाला सुरुवात झाली असल्याचे सांगत विविध उद्यानातील पुष्पोत्सवाला नागरिकांनी येथे भेट देऊन आनंद आणि लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
या उद्यानांमध्ये ‘पुष्पोत्सव’
लक्ष्मी नगर झोनमधील सुर्वे लेआऊट उद्यान, राजीव गांधी उद्यान त्रिमूर्ती नगर, धरमपेठ झोनमधील शंकर नगर उद्यान, ट्रॅफिक पार्क उद्यान, दगडी पार्क उद्यान रामदासपेठ, हनुमान नगर झोनमधील महात्मा गांधी उद्यान, धंतोली झोनमधील मेजर सुरेंद्र देव पार्क, महात्मा फुले उद्यान सुयोग नगर, नेहरू नगर झोनमधील त्रिशताब्दी उद्यान नंदनवन, गांधीबाग झोनमधील भारतमाता / डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, सतरंजीपुरा झोनमधील तुलसीनगर उद्यान शांतीनगर, लकडगंज झोनमधील लता मंगेशकर उद्यान, आशीनगर झोनमधील पाटणकर चौक उद्यान, मंगळवारी झोनमधील ऍड. सखारामपंत मेश्राम उद्यान आणि देशपांडे लेआऊट उद्यान या १५ उद्यानांमध्ये नागरिकांना ‘पुष्पोत्सव’ प्रदर्शनाचा आस्वाद घेता येणार आहे.