– परिवहन विभागाचा 597.32 कोटीचा अर्थसंकल्प मनपा आयुक्त तथा प्रशासक यांना सुपूर्द
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचा परिवहन विभागाचा सन 2024-25 चा सुधारित व 2025-26 चा प्रस्तावित 597.32 कोटीचा अर्थसंकल्प मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांना परिवहन व्यवस्थापक विनोद जाधव यांनी शुक्रवारी (ता. 21) सूपूर्द केला. नागपूर महानगरपालिकेला 400 ई बसेस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रविंद्र पागे, लेखाधिकारी विनय भारद्वाज, समीर परमार, अंकित चौधरी, योगेश लुंगे, व्यवस्थापक विलास जोशी, ऑपरेशनचे राजीव घाटोळे, श्रम अधिकारी अरुण पिंपुर्डे आणि केदार मिश्रा यावेळी उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे सन 2024-25 चे सुधारित वार्षिक अर्थसंकल्पीय अंदाजात सुरवातीची शिल्लकेसह एकुण उत्पन्न रु.509.31 कोटी अपेक्षित असून एकुण व्यय रु.505.81 कोटी अपेक्षित राहील. सन 2025-26 चे वार्षिक अर्थसंकल्प चे उत्पन्न 597.32 कोटी अपेक्षित असून रु.596.70 कोटी खर्च होईल. तर शिल्लक रु.62.46 लक्ष इतकी राहिल.
शहरातील नागरीकांना परिवहन सेवेची आर्थिक सुविधा देणाऱ्या परिवहन विभागाच्या शहर बस ताफयात 230 मिडी ई-बसेस, डिझेल इंधनावर चालणाऱ्या 150 मिडी बसेस, 45 मिनी बसेस व इतर स्क्रॅप बसेस वगळुन 49 स्टॅन्डर्ड बसेस अश्या एकुण 519 बसेसचा संचालनामध्ये समावेश आहे.
मे.साईन पोस्ट इंडिया प्रा.लि. कंपनीकडून बीओटी तत्तवावर 234 बस शेल्टर उभारण्यात आलेले आहे. यातून प्रतीबस स्थानक रु 14,600/-हा निधी रॉयल्टीच्या स्वरुपात विभागात उत्पन्न म्हणून मिळत आहे.
नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सीटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. यांचेकडून नागपूर शहराच्या शहर बस संचालनाकरिता एकुण 40 इलेक्ट्रिक एसी मिडी बसेस खरेदी करण्यात आले आहे. या इलेक्ट्रीक 40 ए.सी मिडी बसेस नागरिकांच्या सेवेत सामील करण्यात आल्या आहेत.
नागपूर शहरात शहर बस संचलनाचे वेळी पर्यावरण संर्वधन व्हावे म्हणून मा. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी 250 स्टॅन्डर्ड वातानुकुलीत विद्युत बसेस खरेदी करण्यात रु. 55 लक्ष प्रतिबस प्रमाणे एकूण रु. 137 कोटी इतके अनुदान उपलब्ध करुन दिलेले आहे. या प्राप्त निधीतुन 250 स्टॅन्डर्ड वातानुकुलीत विद्युत बसेस खरेदीची प्रक्रिया पूर्ण झालेली असून में. नागपुर ट्रान्सपोर्ट सोल्युशन प्रा. लि. यांचेशी करारनामा करण्यात आहे. डेपो व चार्जिग करीता वाठोडा येथील 4 एकर जागा तथा खापरी येथील 3.50 एकर जागा देण्यात येत असून या बसेसचे संचालन टप्याटप्याने जून 2025 अखेर पासून सुरु होण्याची अपेक्षा आहे.
15 व्या वित्त आयोगाच्या प्राप्त होणाऱ्या निर्धातुन परिवहन सेवेच्या बळकटीकरणा करीता बातानुकुलित 144 मिडी बसेससाठी 72 कोटी निधी मिळाल्याने 144 बसेस मनपास प्राप्त झालेल्या आहेत. या सर्व बसेसमध्ये दिव्यांगाचा बस प्रवास हा सुखकर व्हावा यास्तव दिव्यांग प्रवाश्यांना पूरक ठरतील अशी चढ-उतार आणि आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे.
नागपूर शहराकरीता मा. पंतप्रधान ई-बसेस योजनेंतर्गत 150 ई मिडी बसेस मंजूर झालेल्या आहेत. यापैकी 75 बसेस कोराडी डेपो व उर्वरित 75 बसेस खापरी डेपो येथील वाहन तळावरुन संचालित करण्याचे सुनिश्चित करण्यात आलेले आहे. या प्रोजेक्टमध्ये रु 22/- प्रति किलोमिटर प्रमाणे केंद्र शासनाकडुन खर्चाची प्रतिपूर्ती करण्याकरीता निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या बसेसचे संचालन जुलै 2025 पासून सुरु होण्याची अपेक्षा आहे.
नागपूर महानगरपालिकेला 25 आर्टिक्यूलोटेड बसेसकरीता केंद्र सरकार कडून निधी प्राप्त होणार आहे. या प्रोजेक्टकरीता निविदा प्रक्रिया सुरु आहे. बसेसमध्ये एका वेळी 57 प्रवाशी बसून प्रवास करु शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेसचे संचालनाकरीता वाडी येथील पंजाबराव कृषी विद्यापीठ कडून प्राप्त झालेल्या 3 एकर जागेवर डेपो उभारण्याचे काम होणार आहे.
इलेक्ट्रीक बस डेपो निर्मिती करीता सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता रु. 31 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे.
लोकसुधार कार्य भूअर्जन तथा सर्व डेपो संबंधी विकास कामाअंतर्गत रु.2 कोटीची तरतूद सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता करण्यात आलेली आहे.
सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता एकूण संचलन खर्च रु. 280 कोटी अपेक्षित आहे. तर एकुण अपेक्षित उत्पन्न् रु.110 कोटी इतके राहणार आहे. 170 कोटी तुट ही मनपाच्या सहाय अनुदानातुन प्रतिपुर्ती मिळणे अपेक्षित आहे.