– झोननिहाय तयारीचा अतिरिक्त आयुक्तांनी घेतला आढावा
नागपूर :- स्वच्छ सर्वेक्षण २०२४ साठी नागपूर महानगरपालिका सज्ज झालेली आहे. यासंदर्भात बुधवारी (ता.४) अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल गोयल यांनी दहाही झोनच्या तयारीचा आढावा घेतला.
मनपा मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्तांच्या सभाकक्षात आयोजित आढावा बैठकीमध्ये उपायुक्त सर्वश्री. विजय देशमुख, मिलींद मेश्राम, प्रकाश वराडे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सर्वश्री. सहा. आयुक्त हरीश राऊत, गणेश राठोड, अशोक गराटे, नरेंद्र बावनकर, प्रमोद वानखेडे, विजय थुल, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, शिक्षणाधिकारी साधना सयाम, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, उपअभियंता राजेश दुफारे, कार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र बुंधाडे, सुनील उईके, राजेंद्र राठोड, शिंगनजुडे, श्रीकांत वाईकर, अजय पाझारे, कमलेश चव्हाण, अजय गेडाम, मनोज सिंग, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे, सर्व झोनल अधिकारी, केपीएमजी, ह्युमन मॅट्रिक्स या एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी केपीएमजी एजन्सीद्वारे सादरीकरणातून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणासाठी आवश्यक बाबींची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. शहरातील दहाही झोनमध्ये ह्युमन मॅट्रिक्स या एजन्सीच्या प्रतिनिधींद्वारे कचरा संकलन आणि स्वच्छतेबाबत नियमित जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृतीद्वारे झोनमध्ये आवश्यक कार्यांची देखील माहिती यावेळी सादर करण्यात आली. येत्या जानेवारी महिन्यामध्ये नागपूर शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षणची चमूद्वारे पाहणी केली जाणार आहे. त्यादृष्टीने दहाही झोनमध्ये सुरू असलेले स्वच्छतेचे कार्य आणि आवश्यक कार्य याचा यावेळी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी आढावा घेतला.
स्वच्छ सर्वेक्षणसाठी आवश्यक बाबींच्या पूर्ततेबाबत मनपाद्वारे ‘चेकलिस्ट’ तयार करण्यात आलेली आहे. सर्व झोनमध्ये आवश्यक बाबींच्या पूर्ततेकरिता एका कर्मचाऱ्याची जबाबदारी निश्चित करून त्याला ‘चेकलिस्ट’ सोपविण्यात यावी. सदर ‘चेकलिस्ट’नुसार नियमित काम होत असल्याची नियमित खात्री करून वेळोवेळी त्याचा आढावा घेण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी यावेळी दिले. प्रत्येक झोनमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या ‘आयईसी’ चमूची पुरेपूर मदत घेऊन शहरात स्वच्छतेप्रति जनजागृती अभियान राबविणे, नागरिकांना ओला-सुका विलगीकृत कचरा देण्यासाठी जागरूक करणे, अस्वच्छता असलेल्या ठिकाणचे सौंदर्यीकरण करणे, ‘रेड स्पॉट’, ‘ब्लॅक स्पॉट’ शोधून ते बंद करणे यादृष्टीने कार्य करून जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याबाबत देखील त्यांनी निर्देशित केले. त्यांनी झोनस्तरावर स्वच्छतेच्या संदर्भातील आवश्यक कामे देखील तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश झोन सहायक आयुक्तांना दिले.
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये शहराचे विविध मानक तपासून त्यानुसार गुणांकन केले जाणार आहे. त्याकरीता सर्व विभाग प्रमुख व सहा. आयुक्त यांनी तातडीने कार्य पुर्ण करण्याचे निर्देश अति. आयुक्त (शहर) यांनी दिले.