स्वच्छता कार्यात हयगय खपवून घेतली जाणार नाही : सतत गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही होणार कारवाई
नागपूर :- स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने शहर स्वच्छेतेच्या कार्याबाबत दिरंगाई, कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी तंबी देत कामात दिरंगाई करणा-या एका सफाई कर्मचा-याला मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी सेवेतून बडतर्फ केले आहे. याशिवाय विना सूचना, विना अर्ज व विना परवानगीने कामावर सतत गैरहजर राहणा-या कर्मचा-यांवरही कारवाई केली जाणार आहे. शहराच्या स्वच्छतेची महत्वाची जबाबदारी सफाई कर्मचा-यांवर आहे. त्यांनी आपली जबाबदारी ओळखून गांभीर्याने कार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या गांधीबाग झोनमध्ये कार्यरत गौरी राजेश बक्सरे या स्थायी सफाई कर्मचारी महिलेला गैरवर्तन व गैरशिस्तीच्या कारणास्तव मनपाच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. संबंधित महिला सफाई कर्मचारीवर दाखल दोषारोपपत्राच्या अनुषंगाने सुरू असलेल्या चौकशीअंती मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५६ (२) (ह) अन्वये भविष्यात नोकरी मिळण्यास सामान्यपणे अपात्र होईल अशाप्रकारे मनपाच्या सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई केली. यासंबंधी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी आदेश जारी केले आहे.
गौरी राजेश बक्सरे या गांधीबाग झोनमध्ये स्थायी सफाई मजदूर म्हणून कार्यरत होत्या. त्या २३ एप्रिल २०१८ ते ३ फेब्रुवारी २०२० या कालावधीत विना सूचना, विना अर्ज व विना परवानगीने कामावरून सतत गैरहजर होत्या. त्यानंतर कामावर रूजू होईन १६ नोव्हेंबर २०२० पासून ते आजपर्यंत विना सूचना, विना अर्ज व विना परवानगीने कामावरून सतत गैरहजर असल्याचे त्यांच्यावर आरोप होते. यासंबंधी अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशान्वये विभागीय चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त सेवानिवृत्त सहायक वनसंरक्षक मंगल एस. करूणाकार यांनी चौकशी केली. यासाठी संबंधित स्वास्थ निरीक्षकांची साक्ष नोंदविण्यात आली. वेळोवेळी नोटीस बजावून त्यातही संबंधित सफाई कर्मचारी उपस्थित राहत नसल्याचे निदर्शनास आले. नुकतेच चौकशी अधिका-यांनी आपला अहवाल मनपाला सादर केला व त्यावरून आयुक्तांच्या निर्देशानुसार बडतर्फीची कारवाई करण्यात आली.
संपूर्ण नागपूर शहरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२३मध्ये नागपूर शहराचे मानांकन वाढविण्याच्या दृष्टीने मनपाद्वारे सर्व कार्य केले जात आहेत. या कार्यात स्वच्छता कर्मचा-यांची भूमिका महत्वाची आहे. सर्व कर्मचा-यांनी जबाबदारीने आपले स्वच्छता कार्य करून परिसर स्वच्छ राहिल याची काळजी घ्यावी. सोबतच शहरातील नागरिकांनीही आपला परिसर स्वच्छ रहावा यासाठी जबाबदारी स्वीकारावी. घरातील कचरा ओला आणि सुका असा वेगवेगळा संकलीत करूनच तो स्वच्छता कर्मचा-याकडे सोपवावा. कुणीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत असल्याचा त्याचा फोटो काढून तो मनपाच्या सोशल मीडियावर नाव आणि पत्त्यासह पाठवावा, मनपाद्वारे संबंधितावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.