नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे राजीव गांधी उद्यान येथे तयार करण्यात येणाऱ्या ग्लो गार्डनच्या निर्माण कार्याची मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी (१२) पाहणी केली व कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी त्यांनी उद्यानात दररोज येणाऱ्या नागरिकांशी चर्चा केली आणि त्यांच्याकडून मांडण्यात आलेल्या प्रश्नावर संबंधित विभागाला निर्देश दिले.
महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत ग्लो गार्डन (विद्युत सौंदर्यीकरण) विकसित करण्यात येत आहे. संपूर्ण विदर्भात एकमेव असे उद्यान तयार करण्यात येत असून यासाठी जी-२० च्या बचत मधून निधी प्राप्त झाले आहे. विद्युत विभागाद्वारे कार्य सुरु करण्यात आले असून दोन महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे. येथे येणाऱ्या नागरिकांसाठी वन्य प्राण्यांची प्रतिकृती लावण्यात येणार असून सायंकाळी विद्युत रोषणाईमुळे ही प्रतिकृती अत्यंत मोहक व आकर्षक वाटणार आहे. तसेच येथे विद्युत कारंजे, फुलपाखरू, सेल्फी पॉईंट लावण्यात येणार असून ते देखील नागरिकांकरिता आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. सुरु असलेल्या कामाबाबत राजीव गांधी उद्यान ग्रुपच्या नागरिकांद्वारे आयुक्तांकडे काही तक्रारी मांडण्यात आल्या.
डॉ. चौधरी यांनी नागरिकांच्या तक्रारींवर उद्यानातील तुटलेली खेळण्यांची दुरुस्ती करण्यात यावी तसेच विद्युत विभागाने ग्लो गार्डन तयार करताना नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे निर्देश दिले. त्यांनी उद्यानाच्या देखभाली करिता नियुक्त कंत्राटदाराला नोटीस देऊन तात्काळ काढण्याचे आणि नवीन कंत्राटदाराला नियुक्त करण्याचे देखील सक्त निर्देश दिले. त्यांनी लँडस्केपिंग व्यवस्थित करणे, फलॉवर बेड तयार करणे आणि गुलाबाचे उद्यान सुद्धा विकसित करण्याचे आदेश दिले. तसेच ग्रीन जिम सुधारण्याबाबतही निर्देशित केले.
याप्रसंगी उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश राठोड, सल्लागार वंदना चव्हाण, माजी नगरसेवक प्रफुल गुडधे, लहुकुमार बेहेते, परमोरे, विजय निचत, श्री. अशोक पराड, श्री. नीलकंठ सोनकुसरे, श्री. जनार्दन निंबाळकर, श्री. अरुण अखूज, श्री. अरुण बांते आणि मनपाचे उप अभियंता श्री. तारापुरे आदी उपस्थित होते.