– लवकरच मिळणार घराचा ताबा : सर्व मुलभूत सुविधांच्या पूर्तीकडे लक्ष देण्याचे निर्देश
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मौजा वांजरा, कामठी रोड येथे उभारण्यात येत असलेल्या ‘स्वप्ननिकेतन’ या प्रकल्पाची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शनिवारी (ता.११) पाहणी केली. याप्रसंगी अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहायक संचालक नगर रचना ऋतुराज जाधव, कार्यकारी अभियंता सुनील उईके, राजेंद्र राठोड, विकासक गौरव अग्रवाल, राहुल अग्रवाल, उपअभियंता गजेंद्र तारापूरे, प्रकल्प अभियंता प्रतिक गजभिये, आर्चिनोव्हा डिझाईनचे प्रकल्प सल्लागार अभिजीत वडीचार उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे कामठी मार्गावरील पिवळी नदी जवळ मौजा वांजरा येथे ‘स्वप्ननिकेतन’ प्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत ४८० सदनिकांची निर्मिती केली जात आहे. यामध्ये २८.२१ चौ.मी./३०३.६५ चौ. फुट चटई क्षेत्रफळ असलेले 1BHK सदनिका आहेत. सदनिकेची एकूण किंमत ११,५१,८४५ एवढी असून प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत शासनातर्फे २,५०,००० रुपये अनुदान असून सदनिकेचे विक्री मूल्य ९,०१,८४५ रूपये आहे. यातील सदनिकांचे ईश्वर चिठ्ठीद्वारे आवंटन करण्यात आले आहे. प्रकल्प अंतीम टप्प्यात असून आयुक्तांनी ‘सॅम्पल फ्लॅट’ची यावेळी पाहणी केली.
मनपा आयुक्तांनी संपूर्ण प्रकल्पाचे निरीक्षण केले. विद्युत जोडणी, पिण्याचे पाणी यासह अन्य मुलभूत सुविधा लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले. प्रकल्पालगत पिवळी नदीच्या काठावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पातून प्रक्रिया केलेले फक्त पाणी शौचालयामध्ये फ्लशिंगसाठी आणि लँडस्कॅपिंग साठी वापरण्यात येणार आहे.
याकरिता प्रत्येक इमारतीवर स्वतंत्र टॅंक तयार तयार करण्यात आल्याची माहिती विकासक गौरव अग्रवाल व राहुल अग्रवाल यांनी दिली. प्रकल्पा लगत असलेल्या पिवळी नदीवर सुरक्षा भिंत बांधण्याचे काम सनी इन्फ्रास्ट्रक्चर यांचेद्वारे सुरु आहे. हे काम मार्च महिन्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
‘स्वप्ननिकेतन’ प्रकल्पामध्ये बाग, कम्यूनिटी हॉल, लॉबी, लिफ्ट आणि पाणी पुरवठा करणाऱ्या पंपला लागणाऱ्या वीज निर्मितीसाठी सोलर पॅनलची सुविधा, सौर ऊर्जेमार्फत गरम पाण्याची सुविधा, रेन वाटर हार्वेस्टिंगची सुविधा, जलनि:स्सारणची सुविधा आहे. मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रकल्पाच्या सुरु असलेल्या कामाप्रती समाधान व्यक्त केला. घरे आवंटीत झालेल्या व्यक्तींना लवकर ताबा मिळावा यादृष्टीने काम पूर्ण करावे व मुलभूत सुविधांच्या पूर्तीकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.