चंद्रपूर :- चंद्रपूर शहरात “देवी महाकाली” यात्रेस 3 एप्रिलपासून सुरवात होत आहे. अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेची राज्यभरातील भाविक आतूरतेने वाट पाहत असतात. राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या भाविकांच्या सुविधेच्या दृष्टीने चंद्रपूर मनपा प्रशासनद्वारे तयारी करण्यात येत आहे.
महानगरपालिका प्रशासनातर्फ़े यात्रा मैदानाला व्यवस्थेच्या दृष्टीने विविध भागात विभाजित करण्यात येत आहे.यात्रा मैदानात जाण्यास अतिरीक्त रस्ते तयार करण्याचे काम प्रस्तावित असुन झरपट नदी पात्रातील इकोर्निया वनस्पती काढून नदी पात्र स्वच्छ करण्याचे काम सुरु आहे, बैलबाजार भागात पटांगणाची पूर्णतः सफाई व सपाटीकरण करून याच भागात भक्तांकरिता मांडव टाकण्याचे काम सुरू आहे. भाविकांना पिण्यासाठी विविध चौकात 2 हजार लिटरची क्षमता असलेल्या 20 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत असुन भूमिगत पाईप टाकुन पाण्याचे नळ उभारण्यात येऊन पाण्याचे टँकरसुद्धा सज्ज ठेवण्यात येणार आहे.
नदीचे स्वच्छ पाणी मिळण्यास तात्पुरते बंधारे उभारण्याचे काम सुरु असुन भाविकांना आंघोळीसाठी पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टीने शॉवरद्वारे आंघोळीची व्यवस्था करण्यात येत आहे त्याचप्रमाणे सुलभ शौचालय, प्री कास्ट व फिरते शौचालय यांची व्यवस्था केली जात आहे. भाविकांकरीता यात्रा परिसरात मंडप तसेच बैल बाजार परीसर, पंजाबी वाडी व संपूर्ण यात्रा परीसरात विदयुत व्यवस्था उभारली जात आहे. निःशुल्क प्रथोमपचार वैद्यकीय सेवा तसेच 24 तास रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात येणार असुन वेळप्रसंगी नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास नागरीकांना स्थलांतरीत करण्याकरीता मनपाच्या शाळा व इतर ठिकाणे मिळुन 14 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
या काळात मंदिर परिसरात मोठी गर्दी असल्याने पुर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यास 2 कंट्रोल रूम उभारण्यात येत असुन संपूर्ण परिसर हा सीसीटीव्ही निगराणीखाली असणार आहे.स्तनपानासाठी नियंत्रण कक्षलगत हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहे.यात्रेत खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल्स लावण्यात येतात या स्टॉल्सला परवानगी देणे व त्यांची बैठक व्यवस्था करण्यात येत आहे तसेच स्वच्छता कर्मचारी पुर्ण वेळ कार्यरत असणार आहेत. सदर महाकाली मंदिर यात्रा 15 एप्रिल पर्यंत सुरु राहणार असुन या उत्सवादरम्यान नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
परवानगी आवश्यक – महाकाली यात्रा परिसरात ज्या दुकानदारांना आपले दुकान लावायचे आहेत त्यांना मनपाच्या झोन ऑफीस मध्ये नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे कारण जर नोंदणीकृत असेल तर ती अधिकृत माहीती मनपाकडे उपलब्ध राहील व दुकानदारांना यात्रेच्या दिवसांपुरती ठराविक जागा मिळेल.यात्रेत रस्त्यावर तथा मंदिर परिसरात दुकाने लावण्यास पूर्णपणे बंदी लावण्यात आली असुन दुकानदारांसाठी वेगळी जागा देण्यात येणार आहे जेणेकरून परिसरात स्वच्छता राहावी व गर्दीचे नियोजन योग्य प्रकारे व्हावे.
भोजनदान करायचे तर परवानगी आवश्यक – यात्रा परिसरात जर स्वयंसेवी संस्था,व्यक्तींना शीतपेये,भोजनदान करावयाचे असेल तर त्यासाठीही मनपाकडुन रितसर परवानगी घ्यावी लागणार आहे.
महाकाली यात्रेत बर्फी बनविणाऱ्यांसाठी वेगळी जागा – बर्फी बनविणाऱ्यांसाठी वेगळी जागा मनपातर्फे उपलब्ध करून दिली जाणार असुन महाकाली यात्रा परिसरात त्यांना दुकाने लावता येणार नाही.
वाहनतळ व्यवस्था – गौतम नगर (रेल्वे पुलाकडुन),नायरा पेट्रोल पंप मागे (बायपास रोड)सिद्धार्थ स्पोर्टींग क्लब,डी.एड कॉलेज बाबुपेठ,चहारे पेट्रोल पंप मागील जागा,कोनेरी ग्राउंड या ठिकाणी वाहने ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.