– स्वच्छता, सुरक्षा, प्रकाश व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश
नागपूर :- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांद्वारे स्थापना करण्यात येणा-या श्रीगणेशाच्या मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाकरिता कोराडी येथील विशाल आकाराच्या विसर्जन कुंडामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी प्रशासनाद्वारे सुरू असलेल्या तयारीचा गुरूवारी (ता.५) नागपूर महानगरपालिका, नागपूर शहर पोलिस व नागपूर ग्रामिण प्रशासनाद्वारे आढावा घेण्यात आला.
याप्रसंगी सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, ग्रामिण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, निकेतन कदम, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, मनपाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, राजेंद्र राठोड, तहसीलदार सतीश खांडरे , कोराडीचे सरपंच नरेंद्र धानोले उपस्थित होते.
मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार श्रीगणेशाच्या विजर्सनाकरिता नागपूर शहरातील सर्व तलावांमध्ये यावर्षी देखील पूर्णत: बंदी आहे. त्यादृष्टीने सर्व तलाव बंद करून शहरातील दहाही झोन अंतर्गत विविध भागांमध्ये ४०० पेक्षा अधिक कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात येत आहे. या विसर्जन कुंडांमध्ये ४ फुट अथवा त्यापेक्षा कमी उंचीच्या श्रीगणेशाच्या मूर्तींचे विसर्जन करता येईल. ४ फुटापेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी कोराडी येथे विशाल कुंडाची निर्मिती करण्यात आली असून तिथे विसर्जनाची व्यवस्था केली जाते. यावर्षी देखील मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था कोराडी येथील कृत्रिम कुंडामध्येच करण्यात येणार आहे. या विसर्जन स्थळी आवश्यक सुविधा, भक्तगणांची सुरक्षा यादृष्टीने तयारीचा आज गुरूवारी प्रशासनाद्वारे आढावा घेण्यात आला.
विसर्जनस्थळी ३ क्रेन ,पोकलेन ,टिप्पर ,वॉचटॉवर ,ध्वनी प्रक्षेपण सुविधा यासह स्वच्छता रहावी यासाठी पूर्णवेळ वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये स्वच्छता कर्मचारी तैनात ठेवणे, संपूर्ण परिसरात तसेच विसर्जन कुंडाकडे येणा-या मार्गावर प्रकाश व्यवस्था करणे याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्देश दिले. विसर्जनाचे संपूर्ण परिसर आणि मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याद्वारे देखरेख ठेवणे, ड्रोनद्वारे देखील देखरेख ठेवण्याचे निर्देश सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे यांनी दिले.
कोलार नदीमध्ये देखील विसर्जनास प्रतिबंध
कोराडी येथील कृत्रिम तलावालगत कोलार नदीच्या घाटावर देखील नागरिकांकडून श्रीगणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येत असते. मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यावर्षी कोलार नदीमध्ये देखील विसर्जनास प्रतिबंध घालण्यात आले आहे. ४ फुट किंवा त्यापेक्षा मोठ्या उंचीच्या मूर्तींचे कोराडी येथील कृत्रिम तलावात विसर्जन करणे आणि त्यापेक्षा लहान मूर्तींच्या विसर्जनाकरिता नदी जवळ कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात येणार आहे. नागरिकांनी श्रीगणेशाच्या घरगुती मूर्तींचे या कृत्रिम विसर्जन कुंडांमध्येच विसर्जन करावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.