संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
नागपूर :- पी एम स्वनिधी योजनेतून देशभरातील फेरीवाल्यांना मदत होत आहे. ही आनंदाची बाब असली तरी फेरीवाल्यांच्या आरोग्यासाठी कर्मचारी विमा योजनेप्रमाणे विमा योजना तयार करण्यात यावी, अशी मागणी खासदार कृपाल दुकाने यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपप्रश्नाच्या माध्यमातून केली आहे.
लोकसभेत खासदार कृपाल तुमाने यांनी सरकारकडून फेरीवाल्यांसाठी आखण्यात आलेल्या योजना व त्याचा मिळालेला लाभ याविषयी प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी उत्तर दिले. पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत देशभरात 38 लाख 77 हजार 724 लाभार्थ्यांना 65 अब्ज 54 कोटी तीन लाख 46 हजार 217 रुपयांचा मदत करण्यात आली आहे. लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रचा क्रमांक असून 4 लाख 14 हजार 32 लाभार्थ्यांना 596 कोटी 13 लाख 22 हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
पीएम स्वानिधी योजनेतील कर्जपुरवठा करणाऱ्या 95 टक्के बँका या सार्वजनिक क्षेत्रातील असून खाजगी व को-ऑपरेटिव्ह बँकांसह लहान वित्तीय संस्थांकडून केला जाणारा पुरवठा हा अत्यल्प असल्याचे खासदार तुमाने यांनी हरदीप सिंग पुरी यांच्या लक्षात आणून दिले. सोबतच त्यांना कर्ज पुरवठा सोपा करावा व फेरीवाल्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्यासाठी ईएसआयसीच्या धर्तीवर विमा योजना राबविण्यात यावी अशी मागणी केली. पुरी यांनी खा. तुमाने यांनी उचललेल्या बाबींचे कौतुक केले व त्यावर सरकार सकारात्मक पद्धतीने विचार करून त्यावर तोडगा काढेल असा विश्वास दिला.
तुमने यांनी उचललेल्या प्रश्नामुळे फेरीवाल्यांची व रस्त्याच्या कडेला दुकाने थाटून उदरनिर्वाह करणाऱ्यांना कर्जपुरवठा होण्याच्या संबंधाने तसेच त्यांच्या आरोग्य विम्याच्या विषयाने सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता आहे. फेरीवाल्यांचे जीवन व त्यांचे कुटुंबांना सुरक्षा मिळावी यासाठी विमा योजनेसह कर्ज पुरवठा सोपा व्हावा यासाठी पंतप्रधान मोदींसह मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यासाठी सतत संवाद साधू अशी माहिती खासदार कृपाल तुमाने यांनी दिली आहे..