पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शासन करणार
ग्रामपंचायतीतील दोन कर्तबगार महिलांचा सन्मान
– महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई :- राज्यातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ४२४ अंगणवाड्या दत्तक देत आहोत. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शासनातर्फे राज्यातील २७,८९७ ग्रामपंचायती मधील ५५,७९७ कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित सामंजस्य कराराप्रसंगी महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए.कुंदन,एकात्मिक बाल विकासच्या आयुक्त रूबल अग्रवाल, उपआयुक्त विजय क्षीरसागर, विपला फाऊंडेशन, ग्रामसेवा प्रतिष्ठान, स्पर्श चॅरिटेबल ट्रस्ट, कार्बेट फाऊंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री लोढा म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील २७,८९७ ग्रामपंचायती मधील दोन कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. राज्यात १ लाख १० हजार ४४६ अंगणवाड्या कार्यरत आहेत. राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने लोकसहभागातून ‘अंगणवाडी दत्तक’ धोरण आणले आहे. सर्वच अंगणवाड्यांचा विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे.४ आक्टोबर २०२२ रोजी अंगणवाडी दत्तक धोरणासंदर्भात शासनाने सूचना निर्गमित केल्या होत्या.
या धोरणांतर्गत कॉर्पोरेट संस्था, कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी, अशासकीय स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट इ. आणि व्यक्ती, कुटुंब आणि समूहांच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. शासन अंगणवाड्यांच्या बळकटीकरणासाठी विविध योजना राबवत आहे. अंगणवाडी दत्तक धोरण अंतर्गत ४ ऑक्टोबर २०२२ पासून विविध १५६ सामाजिक संस्थांनी आतापर्यंत ४,८६१ अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत. आज विपला फाऊंडेशनने पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ३६८, ग्रामसेवा प्रतिष्ठानने रायगड आणि ठाणे मधील ३०, स्पर्श चॅरिटेबल ट्रस्टने मुंबई उपनगर आणि नाशिक मधील १०, कार्बेट फाऊंडेशनने सिंधुदुर्ग आणि पुणे मधील १६ अंगणवाड्या क्षमता वृद्धीसाठी दत्तक घेतल्या आहेत.