– अर्बन डिझाईन सेल अंतर्गत मनपाला करणार सहकार्य
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि वुमन्स एज्यूकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्कीटेक्चर (एसएमएमसीए) नागपूर यांच्यात बुधवारी (ता.२१) सामंजस्य करार झाला. मनपा आयुक्त कक्षामध्ये करारावर मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. आणि श्रीमती मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्कीटेक्चरच्या प्राचार्या डॉ. रूपल देशपांडे यांनी स्वाक्षरी केली. याप्रसंगी कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, अर्बन डिझाईन सेलचे हर्षल बोपर्डीकर, मोनाली जयस्वाल, महाविद्यालयाच्या तन्वी बुरघाटे, अनुराधा भूते आदी उपस्थित होते.
श्रीमती मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्कीटेक्चरद्वारे नागपूर महानगरपालिकेच्या अर्बन डिझाईन सेल अंतर्गत मनपाला डिझाईन आणि नियोजनासंदर्भात मदत केली जाणार आहे. मनपा आणि महाविद्यालयामध्ये पुढील तीन वर्षासाठी करार करण्यात आलेला असून या तीन वर्षात होणा-या शहरातील विविध विकास कामांमध्ये अर्बन डिझाईन सेल अंतर्गत महाविद्यालयाचे विद्यार्थी कार्य करणार आहेत. विशेष म्हणजे, मार्च २०२३ मध्ये होणा-या जी-२० शिखर परिषदेमध्येही महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे मनपाला सहकार्य लाभणार आहे.
नागपूर शहराचा विकास करतानाच शहरातील रस्ते आणि त्यासोबतच पब्लिक स्पेस विकसीत होणे आवश्यक आहे. या विकासामुळे शहरातील वाहतूक समस्येसोबतच अन्य समस्यांवरही मात करता येउ शकते. याकरिता मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या पुढाकाराने मनपामध्ये ‘अर्बन डिझाईन सेल’ निर्माण करण्यात आले. या सेलच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये रस्ते आणि मोकळ्या जागांच्या विकासाचे डिझाईन आणि नियोजन केले जाते.
करारनाम्यानुसार श्रीमती मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्कीटेक्चरचे विद्यार्थी अर्बन डिझाईन सेल अंतर्गत मनपाला सहकार्य करतील. नागपूर हेल्दी स्ट्रीट प्लान, शहर सौंदर्यीकरण अशा विविध विकासकामांमध्ये अर्बन डिझाईन सेलच्या माध्यमातून मनपाला विद्यार्थ्यांची मदत होणार आहे