मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार २७ जुलै रोजी राजस्थानातील सिकर येथे एका कार्यक्रमात १.२५ लाख पीएम किसान समृद्धी केंद्रे राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहेत. या केंद्रातून खत विक्रीबरोबरच शेतकऱ्यांना माती परीक्षण, बियाणे चाचणी अशा अनेक सेवा- सुविधा पुरविल्या जातील, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, संजय केनेकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते गणेश हाके, विनोद वाघ आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यानिमित्त राज्यात १४ हजार ४२९ केंद्रांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आपण स्वतः नवी मुंबई येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहोत, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
बावनकुळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते यांच्या खरेदीसाठी वेगवेगळ्या दुकानात जावे लागते.पंतप्रधान किसान सुविधा केंद्र ही योजना शेतकऱ्यांना या सर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणाहून पुरविण्यासाठी सुरू करण्यात येत आहे. या केंद्रांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळेल. शेतकऱ्यांना माती, बियाणे, आणि खतांच्या चाचणीची सुविधा उपलब्ध करून देणे, केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी कल्याणाच्या योजनांची माहिती देणे, पीक विमा योजनेची नोंदणी करणे अशा सुविधाही या केंद्रातून उपलब्ध केल्या जातील. देशभरात मागील वर्षी प्रायोगिक तत्वावर किसान समृद्धी केंद्रे सुरु करण्यात आली होती. त्याला मिळालेले यश पाहून किसान समृद्धी केंद्र कार्यन्वित करण्याचा पुढील टप्पा गुरुवारी प्रत्यक्षात येणार आहे.
भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार , खासदार, पदाधिकारी, किसान मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या किसान समृद्धी केंद्रांच्या लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, असेही बावनकुळे यांनी सांगितले.