– 140 वर्ष पुरातन रेणुका माता मंदिराचा जीर्णोद्धार लवकरच
– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतले दर्शन
नागपूर :- मोहगाव झिल्पी परिसरात श्री सिद्धिविनायकाचे सुंदर भव्य मंदिर उभारले गेले आहे. संदीप जोशी यांनी आता श्री रेणुका माता मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला असून लवकरच हे कार्य पूर्णत्वास येईल. माहूरगडला विदर्भातील लाखों भाविक दर्शनाला जातात. अगदी तशीच गर्दी या मंदिरात देखील होणार आहे. श्री. रेणुका माता देवस्थानामुळे मोहगाव झिल्पी विदर्भातील माहूरगड ठरेल, असा विश्वास प्रसिद्ध उद्योजक अरुण लखानी यांनी व्यक्त केला.
मोहगाव झिल्पी येथील 140 वर्ष पुरातन श्री रेणुका माता मंदिराचा भव्य जीर्णोद्धार भूमिपूजन समारोह आज सोमवार दि. 1 जुलै रोजी प्रसिद्ध उद्योजक अरुण लखानी यांच्या हस्ते आणि माहूरगड रेणुका देवी संस्थानचे मुख्य पुजारी व विश्वस्त चंद्रकांत भोपी यांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर होते. मंचावर श्री. रेणुका माता देवस्थानचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी, मोहगाव झिल्पीचे सरपंच प्रमोद डाखले, श्री रेणुका माता देवस्थानचे उपाध्यक्ष आर्कि. प्रशांत सातपुते, सचिव पराग सराफ, सहसचिव अॅड. परेश जोशी, कोषाध्यक्ष अनिरूद्ध भगत, विश्वस्त सर्वश्री आनंद महाजन, डॉ. पियुष आंबुलकर, विनोद कन्हेरे, विश्वस्त सुवर्णा पडोळे आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी सकाळी आठ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोहगाव झिल्पी येथे जाऊन रेणुका मातेचे दर्शन घेतले. यावेळी ना. गडकरी यांनी मंदिर परिसरात पिंपळाच्या रोपट्याचे वृक्षारोपण केले.
भूमिपूजन समारोहाप्रसंगी बोलताना अरुण लखानी म्हणाले, मोहगाव झिल्पी परिसरात संदीप जोशी यांनी सिद्धिविनायक मंदिराची स्थापना केली. त्याच गतीने या 140 वर्ष पुरातन रेणुका माता मंदिराचा जीर्णोद्धार करून येथे भव्य असे मंदिर स्थापन होणार आहे. माहूरगड येथील प्रसिद्ध रेणुका माता मंदिराच्या दर्शनाला दरवर्षी लाखो भाविक माहूर येथे जातात. मात्र या मंदिराची स्थापना झाल्यानंतर विदर्भातील तसेच लगतच्या राज्यातील लाखो भाविक या ठिकाणी रेणुका मातेच्या दर्शनाला येतील, असा विश्वास लखानी यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकेत श्री रेणुका माता देवस्थानचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी मंदिराचा इतिहास सांगितला. रेणुका मातेचे मंदिर 140 वर्षे पुरातन आहे. शेतात असलेले हे मंदिर गावकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी नवरात्रीला नऊ दिवस रेणुका मातेची आराधना मंदिरात होते. नवरात्रीच्या काळात नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमधून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारी देवी अशी या मंदिराची प्रसिद्धी आहे. येथे लवकरच भव्य असे मंदिर उभारले जाणार आहे. यानंतर माहूरगडच्या रेणुका मातेचे दर्शन येथेच लाखो भाविकांना लाभणार आहे, असा विश्वासही संदीप जोशी यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे संचालन नीरज दोंतुलवार यांनी केले. आभार पराग सराफ यांनी मानले.