– ओबीसी, एससी-एसटी, क्रांती दलाचा राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा
चंद्रपूर :- गेल्या दहा वर्षांत निराधार, वंचित, शेतकरी, महिलांसाठी विविध योजना केंद्र सरकारने आणल्या. या माध्यमातून उपेक्षित वर्गाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची आणि देशाचा सर्वांगीण विकास साधण्याची ‘मोदी गॅरंटी’ सन्माननीय पंतप्रधानांनी दिली आहे, असे प्रतिपादन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. राष्ट्रगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच देश विश्वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
चंद्रपूर येथील शकुंतला लॉनमध्ये मंगळवार, 2 एप्रिल रोजी राष्ट्रीय ओबीसी, एससी, एसटी, क्रांती दल महाराष्ट्र राज्य कार्यकर्ता मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला ओबीसी, एससी, एसटी, क्रांती दलाचे अॅड. राजेंद्र महाडोळे, माधव कोहळे, रंजना पारशिवे, राजू बल्लूरवार, धर्माजी मेश्राम, गणेश आत्राम, सुहास काळे, लक्ष्मीकांत लोळगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अॅड. राजेंद्र महाडोळे हे सर्वजातीसमुहाचे सक्षम नेतृत्व असून त्यांनी वंचित, दीनदुर्बलांना एकत्रित करण्याचे काम केले आहे. त्यांनी जनतेचा विकास आणि मोदी गॅरंटीच्या आधारावर मनापासून दिलेला हा पाठिंबा नक्कीच ही लोकसभा निवडणूक जिंकून देईल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.