नागपूर :- मेळघाटातील नवजात शिशु आणि गर्भवतींच्या सुलभ लसीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल व्हॅनला आज येथे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी हिरवा झेंडा दाखविला.
उपायुक्त आशा पठाण, माहिती संचालक हेमराज बागुल, उपविभागीय अधिकारी सुभाष ढाले, नायब तहसिलदार आर.एस.वानखेडे, टाईड वॉटर ऑईल कंपनी (इंडिया) लिमिटेडचे सदस्य तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
टाईड वॉटर ऑईल कंपनीच्या सहकार्याने विदर्भ सहायता समितीकडून प्राप्त झालेल्या मोबाइल व्हॅनला अमरावती जिल्ह्यात रवाना करण्यात आले. अमरावती जिल्हयातील मेळघाट, धारणी, चिखलदरा येथे या व्हॅनच्या माध्यमातून लसीकरणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. या वाहनात लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात आला असून लहान बालके व गर्भवतींना सर्व प्रकारच्या लसीकरणाची सुविधा या व्हॅनच्या माध्यमातुन करण्यात आली आहे. आरोग्य पथकाचा यात सहभाग राहणार आहे. लसीकरणासाठी आवश्यक शीतपेटी व आदी सुविधा या व्हॅनमध्ये उपलब्ध असल्याची माहिती संबंधितांनी दिली.