नागपूर :- “ससा आणि कासव” या सर्व परिचित कथेचा आधार असलेल्या ‘मिस्टेक्स रॅबिट मेड’या पुस्तकात शर्यतीपूर्वी घडणाऱ्या घटना अतिशय समर्पकपणे मांडल्या असून कासवापेक्षा अत्यंत वेगवान असलेला ससा ज्या कारणांमुळे हरतो तीच कारणे माणसाच्या देखील अधोगतीस कारणीभूत ठरतात त्यामुळे मानवाच्या प्रगतीकरिता हे पुस्तक दिशादर्शक असल्याचे मत, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी व्यक्त केले.
शहरातील क्रॉसवर्ड्स येथे राजेश ढाबरे कस्टम्स कमिशनर चेन्नई लिखित ‘मिस्टेक्स रॅबिट मेड’ या पुस्तकाचे विमोचन बिदरी,अविनाश थेटे, किशोर मानकर, यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या उपस्थितीत पार पडले.
अतिशय नाविन्यपूर्ण शैलीत बोधकथेची मांडणी केल्याबद्दल विभागीय आयुक्त बिदरी यांनी लेखकाचे अभिनंदन केले तसेच सर्वांना हे पुस्तक वाचण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात अभिनव कलानिकेतन व आंबेडकरी नाट्य साहित्य क्षेत्रातील दादाकांत धनविजय, पुरण मेश्राम कुलसचिव नागपूर विद्यापीठ वनराईचे गिरीश गांधी, सामाजिक चळवळीतील वामन सोमकुवर आदी मान्यवर उपस्थित होते.
पाहुण्यांचे स्वागत डॉ. भावना ढाबरे, डॉ. माधवी ढाबरे यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय चालखूरे यांनी केले.