राज्यात ‘वाचन चळवळ’ उभी करणार – मंत्री दीपक केसरकर

– माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई :- माजी राष्ट्रपती दिवंगात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालय येथे डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी वाचन संस्कृती रुजण्यासाठी आणि वाढविण्यासाठी राज्यात लवकरच ‘वाचन चळवळ’ उभी करणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी केले.

यावेळी शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव हर्षवर्धन जाधव, अवर सचिव अजय भोसले, कक्ष अधिकारी ऐश्वर्या गोवेकर, सहायक कक्षधिकरी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

मंत्री केसरकर म्हणाले की, वाचनाची चळवळ ही संपुर्ण देशात उभी रहावी यासाठी देशात ‘रीड इंडिया’ ही चळवळ राबविली जात आहे. याच धर्तीवर राज्यात ही चळवळ उभी राहवी यासाठी लवकरच ‘वाचन चळवळ’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावर्षी उपक्रमाची सुरूवात मुंबई शहरातून करण्यात आली असून राज्यात तळागाळापर्यंत वाचनसंस्कृती पोहचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून 2 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील विद्यार्थी आणि तरूण पीढीपर्यंत राज्यातील मराठी साहित्य, थोर महापुरूष तसेच शुर, सरदारांचा इतिहास आणि जेष्ठ शास्त्रज्ञ यांचे कार्य समजावे यासाठी प्रत्येक शाळेत पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी सर्वाधिक वाचन केले जाते त्या ठिकाणी जास्त शास्त्रज्ञ घडतात. यासाठी मराठी भाषा भवनाचे काम लवकरच पुर्ण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विश्व मराठी साहित्य संमेलनातून मराठी भाषेची महती जगभर पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्‍यात येत असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे उत्तम लेखक, शास्त्रज्ञ तर होतेच याचबरोबर ते उत्तम वाचकही होते. वैज्ञानिक आणि राष्ट्रपती म्हणून ते जनसामान्यांशी जोडले गेले होते. त्यामुळे त्यांचे हे कार्य भावी पीढीसाठी दिशा देणारे ठरले. माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती आज राज्यात सर्वत्र ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरी केली जात आहे. या दिनानिमित्त संपूर्ण राज्यात शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी मंत्री केसरकर यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

समृद्धी महामार्गावर वैजापूरजवळील अपघाताबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त

Mon Oct 16 , 2023
– नागपूर समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई :- नागपूर समृध्दी महामार्गावर वैजापूर तालुक्यात जांबरगाव टोलनाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकचा झालेला अपघात अत्यंत भीषण होता. या अपघातात निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले, हे वृत्त अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com