मुंबई :- अंगणवाड्या उभारणी तसेच दुरुस्तीसाठी पुढील अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव महिला व बाल विकास विभागामार्फत तयार करण्यात येईल, अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितली.
याबाबत सदस्य मोनिका राजळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य भास्कर जाधव यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
मंत्री तटकरे म्हणाल्या की, अंगणवाड्यांसाठी जिल्हा परिषदेच्या खोल्या उपलब्ध करून देण्याबाबत महिला व बालविकास विभागाने ग्रामविकास विभाग व शालेय शिक्षण विभागास प्रस्ताव पाठवला असून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे राज्यातील 22 हजार 500 अंगणवाड्यांचा इमारतीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सर्व अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू असून वित्त आयोग, जिल्हा परिषदेचा निधी, डोंगरी विकास निधी,जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून अंगणवाड्यांची दुरुस्ती तसेच नवीन बांधकाम केली जात आहेत. अंगणवाड्यांमधील शौचालयाकरिता केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाच हजार 375 अंगणवाड्यांपैकी चार हजार 65 अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत आहे. अहमदनगर जिल्ह्यात 15व्या वित्त आयोगाने जिल्हा परिषद विकास आराखडा मध्ये 98 अंगणवाडी बांधकामे प्रस्तावित करण्यात आली असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले.