मेट्रो ७, मेट्रो २अ ची सेवा मुंबईकरांसाठी वरदान ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार लोकार्पण

मुंबई :- मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो मार्ग ‘२अ’ ची सेवा मुंबईकरांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-२) आणि मार्ग २अ (टप्पा-२) चे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारी रोजी होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंधेरी परिसरातील गुंदवली स्थानक येथे भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली.

यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो मार्ग २ अ चा ३५ किलोमीटर्सचा टप्पा पूर्ण झाला आहे. यातील ३३ स्थानके लोकांच्या सेवेत दाखल होणार आहेत. हा टप्पा लोकांच्या सेवेत येण्याने अंधेरी, दहिसर, वर्सोवा या परिसरातील मुंबईकरांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होईल.

रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या १९ जानेवारीला होणार आहे. या मेट्रोचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते झाले होते, हा एक मोठा योगायोग आहे. लाखो लोकांना दिलासा देणारा हा प्रकल्प आहे. लोकांना आरामदायी प्रवास करता येणार आहे. ही मेट्रो लाखो मुंबईकरांसाठी वरदान ठरेल. मुंबईमध्ये आम्ही अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. रखडलेले हे प्रकल्प आम्ही वेगाने मार्गी लावले आहेत. काँक्रीटचे रस्ते, एसटीपी प्लांट, आरोग्याचे विषय, सुशोभीकरण अशा प्रकल्पांचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. ही मुंबईकरांसाठी एक मोठी भेट ठरेल, असा विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री यांनी नमूद केले.

मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो मार्ग २अ ची वैशिष्ट्ये…

मुंबई मेट्रो कॉरिडॉरमध्ये एकूण ३३७.१ किमी लांबीचे मार्ग बांधणे प्रस्तावित आहे. हे सर्व मेट्रो मार्ग पूर्ण झाल्यावर, मेट्रो प्रणालीमध्ये दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रणालीच्या १.३ पट प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता असेल.

मुंबई मेट्रो मार्ग ७ विषयी…

मुंबई मेट्रो मार्ग ७ गुंदवली (अंधेरीपूर्व) ते दहिसर पूर्व कॉरिडॉर ही पश्चिम द्रुतगती मार्गालगत असून मुंबई मेट्रो मार्ग ७ मुळे मुंबईच्या पश्चिमेकडील भागांना पूर्वेकडील भागांशी जोडून सेवा देईल.

मुंबई मेट्रो मार्ग ७ मुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरील भार कमी होण्यास मदत होणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग-७ टप्पा-१ आणि टप्पा २ या दोन टप्प्यात पूर्ण केली आहे.

मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-१ ) हा १०.९०२ किमी लांबीचा उन्नत कॉरिडॉर आहे ज्यामध्ये ९ स्थानके आहेत (आरे ते दहिसर (पू)) ज्यामधे (दहिसर (पू) हे स्थानक मुंबई मेट्रो मार्ग २अ अंतर्गत येते.

मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-१) मध्ये (१) ओवरीपाडा (२) राष्ट्रीय उद्यान (३) देवीपाडा (४) मागाठाणे (५) पोईसर (६) आकुर्ली (७) कुरार (८) दिंडोशी (९) आरे या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.

मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-२) ५.५५२ किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे ज्यामध्ये ४ स्थानके आहेत (गुंदवली ते आरे), मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-२) मध्ये (१) गोरेगाव पूर्व (२) जोगेश्वरी पूर्व (३) मोगरा (४) गुंदवली या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.

मुंबई मेट्रो मार्ग २अ विषयी….

मुंबई मेट्रो मार्ग २अ अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व कॉरिडॉर मुंबईच्या पश्चिमेकडील भागांसाठी अत्यंत उपयुक्त असा मार्ग आहे.

मुंबई मेट्रो मार्ग २अ सुद्धा टप्पा-१ आणि टप्पा-२ या दोन पूर्ण केली आहे.

मुंबई मेट्रो मार्ग २अ (टप्पा-१) हा ९.८२८ किमी लांबीचा उन्नत मार्ग आहे ज्यामध्ये ९ स्थानके आहेत (डहाणुकरवाडी ते दहिसर पूर्व).

मुंबई मेट्रो मार्ग २ अ (टप्पा-१) मध्ये (१) दहिसर पूर्व (२) आनंद नगर (३) कांदरपाडा (४) मंडपेश्वर (५) एकसर (६) बोरिवली प. (७) पहाडी एकसर (८) कांदिवली प. (९) डहाणुकरवाडी या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.

मुंबई मेट्रो मार्ग २अ (टप्पा-२) हा ८.७६८ किमी लांबीचा एलिव्हेटेड मार्ग आहे ज्यामध्ये स्थानके आहेत (वळनाई ते अंधेरी प.),

मुंबई मेट्रो मार्ग २अ (टप्पा-२) मध्ये (१) वळनई (२) मालाड प. (३) लोअर मालाड (४) पहाड़ी गोरेगाव (५) गोरेगाव प. (६) ओशीवरा (७) लोअर ओशीवरा (८) अंधेरी प. या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.

मुंबई मेट्रो मार्ग ७ – एकूण लांबी १६.५ किमी, एकूण स्थानके १३ (उन्नत)

कार्यान्वयीत स्थानकेः ९ (टप्पा-१) (१) ओवरीपाडा (२) राष्ट्रीय उद्यान (३) देवीपाडा (४) मागाठाणे (५) पोईसर (६) आकुर्ली (७) कुरार (८) दिंडोशी (९) आरे

टप्पा-२ मधील स्थानके: ४ (१) गोरेगाव पूर्व (२) जोगेश्वरी पूर्व (३) मोगरा (४)

इंटरचेंज स्थानके : (१) गुंदवली- मेट्रो मार्ग १ वरील पश्चिम द्रुतगती मार्ग स्थानकासोबत (२) जोगेश्वरी पूर्व मेट्रो मार्ग ६ सोबत

मुंबई मेट्रो मार्ग २ अ – एकूण लांबी १८.६ किमी, एकूण स्थानके: १७ (उन्नत)

कार्यान्वयीत स्थानकेः ९ (टप्पा-१) ((१) दहिसर पूर्व (२) आनंद नगर (३) कांदरपाडा (४) मंडपेश्वर (५) एकसर (६) बोरिवली प. (७) पहाडी एकसर (८) कांदिवली प. (९)) डहाणुकरवाडी

टप्पा-२ मधील स्थानके : ८ (१) वळनई (२) मालाड प. (३) लोअर मालाड (४) पहाडी गोरेगाव (५) गोरेगाव प. (६) ओशीवरा (७) लोअर ओशीवरा (८) अंधेरी प.

इंटरचेंज स्थानके : (१) दहिसर पूर्व मेट्रो मार्ग ९ सोबत (२) अंधेरी प. मेट्रो मार्ग १ वरील डि. एन. नगर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तेलंगणाच्या माहिती संचालकांची जनसंपर्क महासंचालनालयास भेट

Fri Jan 13 , 2023
मुंबई : तेलंगणा राज्याचे माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक बी. राजा मौली यांनी आज माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज यांची भेट घेऊन महासंचालनालयाच्या कामकाजाची माहिती घेतली. तेलंगणा राज्याचे माहिती संचालक बी. राजा मौली यांच्या अध्यक्षतेखाली पथकाने आज माहिती व जनसंपर्क महासंचालनालयास भेट दिली. पथकात सहसंचालक डी. एस. जगन, सहसंचालक डी. एस. श्रीनिवासन यांचा समावेश होता. महासंचालक जयश्री भोज यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!