मराठी भाषेमध्ये विश्वाची भाषा होण्याचे गुण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

– मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुरस्कार प्रदान

मुंबई :- “जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी जनांना एका धाग्यात जोडण्याचे काम माय मराठी करते. जी भाषा सर्वांना जोडते, सामावून घेते, माणुसकी शिकवते तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची भाषा होते. हे सर्व गुण मराठी भाषेत आहेत”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वनिचित्रमुद्रित संदेशाद्वारे शुभेच्छा देताना केले.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषा विभागातर्फे यानिमित्त वर्षी हा कार्यक्रम “यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान” मुंबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ध्वनिचित्रमुद्रित संदेशाच्या माध्यमातून ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीधर दीक्षित, मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भाषावार प्रांत रचनेनंतर महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन मराठी ही राजभाषा झाली. शासनाने मराठीच्या जतन व संवर्धनासाठी स्वतंत्र मराठी भाषा विभाग स्थापन केला. त्यामुळेच लोकभाषा, ज्ञानभाषा, राजभाषा म्हणून मराठी गौरवाने प्रस्थापित झाली आहे. बोली भाषा संवर्धनासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. साहित्य प्रसार, भाषा विकास आणि संशोधनासाठी, साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक दर्जाचे मराठी भाषा भवन मुंबईत साकारण्यात येत आहे. हे भवन महाराष्ट्राचा मानबिंदू ठरेल, असा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम होत आहेत. यामुळे मराठी भाषा समृद्धीला हातभार लागत असून अशा महोत्सवाच्या माध्यमातून मराठी भाषा जागतिक स्तरावर नेण्यासाठी यंदा प्रथमच विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे तसेच जगभरातील मराठी जनांचा याला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राज्य शासनाने राज्यगीत म्हणून ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत स्वीकारले आहे, याचेही सर्वत्र कौतुक होत असल्याचे सांगून या गीताप्रमाणेच महाराष्ट्र हा भाषेच्या पातळीवरही सर्वत्र गर्जत राहील, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. मराठी भाषा विभागाच्या सर्व उपक्रमांना शुभेच्छा व्यक्त करून विभागामार्फत पुरस्कार प्राप्त साहित्यिक आणि संस्थांचे त्यांनी अभिनंदन केले.

मराठी भाषेचे भवितव्य उज्ज्वल – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

आपला देश हा बहुभाषिक देश आहे. सुमारे साडेसहाशे वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा इथे बोलल्या जातात. जगभरातील दहा कोटी जनता मराठी भाषा बोलते, मराठी भाषेचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

ॲड. नार्वेकर पुढे म्हणाले की, मराठी भाषा ही देशात तिसऱ्या आणि जगात दहाव्या क्रमांकावरील संवादाची भाषा आहे. भाषेचे संवर्धन करुन ती नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याची आणि संविधानातील तरतुदीनुसार स्थानिक भाषा जगविण्याची जबाबदारी आपली आहे. यासाठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळ जोपासली पाहिजे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पाठपुरावा करावा त्यासाठी विधिमंडळातील सर्व सहकारी यांच्याकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असेही ॲड. नार्वेकर म्हणाले.

नवीन शैक्षणिक धोरणामुळे मातृभाषेतून शिक्षण – चंद्रकांत पाटील

कविता, नाटक, पोवाडे, गीते आदी विविध माध्यमांतून मराठी भाषा जनसामान्यांपर्यंत पोहोचली आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुरस्कार प्राप्त झालेल्या तसेच अन्य साहित्यिकांच्या योगदानामुळे मराठी भाषा समृद्ध होत असल्याचे सांगून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचे अभिनंदन केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ‘मातृभाषेतून शिक्षण’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारे नवीन शैक्षणिक धोरण यावर्षीपासून राज्यात लागू करण्यात येत असून अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम आता मराठीत उपलब्ध असणार असल्याचे सांगितले. मराठीतून अभ्यासक्रम शिकण्यासाठी यावर्षी 67 टक्के विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यामुळे केवळ इंग्रजीतूनच उच्च शिक्षण घेता येते, हा प्रघात संपेल आणि मराठी भाषा वृद्धिंगत होण्यास हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

युवा साहित्यिकांना प्रोत्साहन देणार – दीपक केसरकर

युवा साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमिका असून मराठी युवक मंडळ ही नवी संकल्पना राबविण्यात येणार असल्याची माहिती, मराठी भाषा मंत्री श्री.केसरकर यांनी दिली. तरुण पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी या मंडळांना दहा हजार रुपये अनुदान देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषा संस्कृती व विकास यासाठी कार्य करणाऱ्या मान्यता प्राप्त मंडळांना दहा लाख रुपये अर्थसाहाय्य देण्यात येईल. त्यानुसार महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषा संस्कृती व विकास यासाठी अर्थसाहाय्य देणार आहे. महाराष्ट्राबाहेर होत असलेल्या साहित्य संमेलनांना 25 लाख रुपये देणार असल्याचीही माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

मराठी भाषा विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती अपर मुख्य सचिव म्हैसकर यांनी दिली.

या कार्यक्रमात मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा व साहित्य विकासासाठी कार्यरत असलेल्या मान्यवरांना दिले जाणारे विविध साहित्यिक पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावर्षी विविध महानगरपालिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘मराठी वाचन प्रेरणा दिन’ स्पर्धेतील तीन विजेत्या महानगरपालिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने 35 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी देण्यात आलेले पुरस्कार

• सन २०२२ चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रा. चंद्रकुमार नलगे यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. प्रा. नलगे यांनी कथा कादंबरी, एकांकिका, चित्रपट लेखन इत्यादी विविध प्रकारात लेखन केले. त्यांच्या प्रकाशित ग्रंथाची संख्या ९० आहे. त्यांना यापूर्वी विविध पुरस्कार, आदर्श शिक्षक तसेच राज्य शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

• श्री. पु. भागवत पुरस्कार २०२२ चा पुरस्कार ग्रंथाली प्रकाशनला प्रदान करण्यात आला. ३ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. प्रकाशित ग्रंथांची संख्या १ हजार २४०, सतत ४८ वर्ष कार्यरत असलेल्या ग्रंथालीने विविध विषयात प्रकाशने, पुस्तक प्रदर्शने, ग्रंथ चर्चा, वाचक चळवळ इत्यादी उपक्रम राबविले आहेत.

• डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२२ (व्यक्तींसाठी) दिला जाणारा पुरस्कार डॉ. विठ्ठल वाघ यांना जाहीर करण्यात आला. त्यांच्या वतीने मुलगा अभिजित वाघ याने पुरस्कार स्वीकारला. २ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. विठ्ठल वाघ यांनी वऱ्हाडी म्हणी, वऱ्हाडी बोलीचे संशोधन, देश विदेशात काव्य वाचनातून समाज प्रबोधनाचे कार्यक्रम, कविता, कांदबऱ्या, संशोधन अशा विविध साहित्य प्रकारात लेखन केले आहे.

• कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२२ (व्यक्तींसाठी) द. ता. भोसले यांना देण्यात झाला. २ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. ग्रामीण बोलीचा शब्दकोश, लोपलेल्या सुवर्णमुद्रा ही बोली भाषेवरील महत्वाची पुस्तके, खेड्यातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी २५ हून अधिक वर्षे ते कार्यरत आहेत.

• डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२२ (संस्थेसाठी) दिला जाणारा पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांना दिला आहे. २ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. संस्थेची स्थापना १९०६, मराठी भाषा आणि साहित्य यांच्या विकास व प्रचारासाठी कार्यरत, विविध साहित्य प्रकारातील ४० हून अधिक पुरस्कार या संस्थेद्वारे प्रदान करण्यात येतात. लेखन कार्यशाळा सारखे उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात येतात.

• कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२२ (संस्थेसाठी) हा पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी यांना देण्यात आला आहे. २ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. संस्थेची स्थापना १९९९, मराठी भाषा साहित्य संस्कृतीसाठी कार्यरत साहित्य संमेलने | लेखक वाचक संवाद लेखन कार्यशाळा असे विविध उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात येतात.

• माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि तृतीय क्रमांक भिंवडी-निजामपूर महानगरपालिका यांना प्रदान करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Compensation to heavy rains affected farmers before March 31 - CM Eknath Shinde

Wed Mar 1 , 2023
Mumbai : Farmers in many districts of Maharashtra suffered heavy losses due to excessive and heavy rainfall. An amount of Rs. 755 crore has been paid as compensation for such losses. Those farmers who have not yet received the compensation amount will be paid the same by March 31, said Chief Minister Eknath Shinde in the Vidhan Sabha today. The […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com