जल विद्युत ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी सात कंपन्यांमध्ये सामंजस्य करार

– ऊर्जा निर्मितीसाठीच्या सामंजस्य करारामुळे अर्थव्यवस्था वाढीस गती ;

– ऊर्जा निर्मिती करारामुळे 72 हजाराहून अधिक रोजगार निर्मिती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- जल विद्युत ऊर्जा निर्मितीसाठीच्या पंम्प्ड स्टोरेज प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि विविध सात ऊर्जा कंपन्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे 40 हजार 870 मेगावॅट ऊर्जा निर्मिती होणार असून, राज्यात दोन लाख 14 हजार कोटींची गुंतवणूक आणि 72 हजाराहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. राज्याची अर्थव्यवस्था तीन ट्रिलीयन करण्याच्या उद्देशास या करारामुळे गती मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आज सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र शासन आणि एन टी पी सी, वेलस्पन न्यू एनर्जी, एन एच पी सी, रीन्यू हायड्रो पावर, टी एच डी सी इंडिया, टोरंट पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय अधिकारी आणि खाजगी कंपन्यांचे प्रतिनिधी यांचे अभिनंदन केले. गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, जलसंपदा प्रकल्प व विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.दीपक कपूर, जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी यांच्यासह अधिकारी आणि खाजगी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात 46 हजार मेगावॉट ऊर्जा निर्मिती होते या कराराच्या माध्यमातून अधिकची 40 हजार 870 मेगाव्हॅट वीजनिर्मिती होणार आहे. या करारांमुळे दोन लाख 14 हजार कोटींची गुंतवणूक राज्यात होणार असून, तीन ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे राज्याचे जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यास गती प्राप्त होणार आहे. या सामंजस्य कराराची गतीने होऊन अंमलबजावणी होणार आहे. यामुळे 72 हजार पेक्षा जास्त नवीन रोजगार निर्मिती होणार आहे.

नैसर्गिक संसाधनांचा वापर करून ऊर्जा शाश्वत पद्धतीने निर्माण करू शकतो. राज्यात पश्चिम घाटात विशेष जैवविविधता आहे. तेथे अनेक ठिकाणी शीतगृहांसाठी ऊर्जेचा वापर होणार आहे. शासकीय आणि खाजगी क्षेत्राने उत्सुकतेने हे करार पूर्णत्वास नेण्यास सहकार्य केले आहे. यामुळे राज्यासाठी शाश्वत वीजनिर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस सहकार्य लाभणार असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

डॉ.दीपक कपूर यांनी विविध सात कंपन्यांअंतर्गत होणाऱ्या करारासंदर्भात अधिक माहिती दिली. नॅशनल थर्मल पॉवर कंपनीअंतर्गत ९०७८ काटी इतकी गुंतवणूक होणार आहे तर १४०० रोजगार निर्मिती , एक हजार ८०० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. वेल्सपन न्यु एनर्जी कंपनी अंतर्गत्‍ पाच हजार कोटी गुंतवणूक तर १५०० रोजगार निर्मिती, एक हजार २०० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे.

एनएचपीसी लिमिटेड अंतर्गत्‍ ४४ हजार १०० कोटी इतकी गुंतवणूक, ७ हजार ३५० रोजगार निर्मिती आणि ७ हजार ३५० मेगा वॅट वीज निर्मिती होणार आहे. रिन्यु हायड्रो पावर लिमिटेड अंतर्गत १३ हजार १०० कोटी गुंतवणूक, पाच हजार रोजगार निर्मिती, दोन हजार ६०० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे.

टेहेरी हायड्रो डेव्हलपमेंट कार्पोरेशन इंडिया लिमिटेड अंतर्गत ३३ हजार ६२२ कोटी गुंतवणूक, ६ हजार ३०० रोजगार निर्मिती तर ६ हजार ७९० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. टोरन्ट पावर लिमिटेड अंतर्गत २८ हजार कोटी गुंतवणूक १३ हजार ५०० रोजगार निर्मिती, ५ हजार ६०० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत ५४ हजार ४५० कोटी इतकी गुंतवणूक, ३० हजार रोजगार आणि ९ हजार ९०० मेगा वॅट इतकी वीज निर्मिती केली जाणार असल्याची माहिती अपर मुख्य सचिव डॉ.कपूर यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मौजे काळुस बाबत कायदेशीर बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेऊ - मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील

Wed Sep 4 , 2024
मुंबई :- मौजे काळुस (ता. खेड जि. पुणे) येथील भूसंपादन रद्द करण्याबाबत आणि पुनर्वसनाचे शिक्के उठवण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेतला जाईल. असे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस खासदार अजित गोपछेडे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह जलसंपदा, मदत व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!