महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन
अंडी उबवण केंद्र नवीन इमारत व पक्षीगृहांचा लोकार्पण सोहळा
नागपूर दि. 24 : ग्रामीण अर्थव्यवस्था हा मूलभूत विषय घेऊन ग्रामीण भागाचा विकास करण्याचा ध्यास घेतला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण होतकरुंना शेळी वाटप, कुक्कुट पालनाचे उद्योग राबवून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला. या उपक्रमास राज्याने सुध्दा अंगिकारले आहे. हे कार्य नेहमी संस्मरणी राहील, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले.
महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर कार्यालयाच्या प्रशासकीय इमारत बांधकामाचा भूमिपूजन व प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र येथील नवीन पक्षीगृह व कुक्कुट प्रशिक्षण केद्रांच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, पशुसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त डॉ. संजय गोरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजूषा पुंडलिक, कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मोहन खंडारे, डॉ. सतीश राजु, डॉ. नितीन फुके, प्रादेशिक अंडी उबवणे केंद्राचे सहाय्यक आयुक्त श्री. बळी, डॉ. वर्षा तलमले, उपविभागीय अभियंता प्रशांत शंकरपुरे आदी यावेळी उपस्थित होते.
कोरोना काळात राज्यातील सर्व उद्योग, व्यवसाय बंद पडले होते, त्यावेळी कृषी व पशुपालन हाच एकमेव व्यवसाय सुरु होता. त्यामुळे राज्याला महसूल मिळाला आहे. शासकीय कुक्कुट उद्योगाद्वारे निर्मित दीड कोटी अंडी इतर राज्यात देण्यात येत आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या अनेक योजनाद्वारे ग्रामीण भागात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. यामुळेच गावची अर्थव्यवस्था मजबूत होईल, असा दृढविश्वास श्री. केदार यांनी व्यक्त केला. अंड्यामुळे मानवी शरीरास प्रोटिन्सचा पुरवठा होतो. त्यामुळे आरोग्य चांगले ठेवण्यासही मदत होते. पशुसंवर्धन विभागाचे उपक्रम योग्य रितीने राबवा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पश्चिम महाराष्ट्रात दुग्धव्यवसाय प्रगती पथावर आहे. त्याच धर्तीवर विदर्भात या पूरक व्यवसायास चालना द्या. शासकीय कॅटलफिल्डचा कारखाना नागपुरात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. धनंजय परकाळे यांनी प्रास्ताविकात महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या कार्याचा आढावा सांगतांना हे कार्यालय पुणे येथून नागपूर येथे स्थलांतरित करण्यात आले. म्हापसु विद्यापीठासह पशुविज्ञानाविषयी कार्यालय येथे असल्याने दुग्धव्यवसाय व अर्थाजनसाठी उपयुक्त ठरेल असे ते म्हणाले. पशुसंवर्धन मंत्र्यांनी नेहमी पाठपुरावा करुन पशु विमा योजनेसाठी केंद्रात पाठपुरावा केला. त्यामुळेच पशुपालकांना हा विमा मिळणार आहे. त्यासोबतच केज योजना सर्व राज्यात लागू करण्यात येणार आहे. कुक्कुट प्रशिक्षक केंद्रामुळे पशुपालकांना हजारोच्या संख्येने येथेच प्रशिक्षण देणे सोयीचे होणार आहे. मंजूषा पुंडलिक यांनी नवीनअंडी उबवण केंद्रांच्या इमारतीमुळे अंडी उत्पादनात निश्चित वाढ होणार असल्याचे सांगितले.
प्रारंभी वळू संगोपन केंद्रातील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर कार्यालयाच्या 6 कोटी 25 लक्ष किमंतीच्या प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन श्री. केदार यांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर सेमीनरी हिल्स येथील 6 कोटी 40 लक्ष रुपये किंमतीच्या प्रादेशिक अंडी उबवण केंद्राच्या नवीन इमारत व 1 केाटी 43 लाख रुपये किंमतीच्या पक्षीगृहांचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. यावेळी केदार यांनी गोट शेडला भेट दिली व तेथील वळूची माहिती जाणून घेतली.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक आयुक्त डॉ. संजय धोटे यांनी केले. विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.