Ø जिल्ह्यात वागदरा येथे कार्यक्रमाचे थेट प्रसारण
Ø प्रधानमंत्र्यांचा कोलाम लाभार्थ्यांशी होणार संवाद
Ø दुर्गाडा व रामपुर येथील बहुउद्देशिय केंद्राचे भुमिपुजन
यवतमाळ :- प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजनेंतर्गत मेगा ईव्हेंटचे आयोजन मारेगाव तालुक्यातील वागदरा येथे दि.२ ऑक्टोंबर रोजी सकाळी 11.30 वाजता करण्यात आले आहे. या योजनेचे अनावरण आभासी पद्धतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी प्रधानमंत्री दुरदृष्य प्रणालीद्वारे कोलाम लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहे.
या कार्यक्रमामध्ये कोलाम जमातीच्या लाभार्थ्यांस पीएम जनमन योजनेंतर्गत प्रमाणपत्राचे वाटप, बहुउद्देशिय केंद्र बांधकामाचे भुमिपुजन, जनजातीय उन्नत ग्राम अभियान या नवीन योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ऑनलाईन आभासी पध्दतीने होणार आहे. पीएम जनमन योजनेंतर्गत मारेगाव तालुक्यातील दुर्गाडा येथील बहुउद्देशिय केंद्र बांधकामाचे भुमिपुजन पालकमंत्री संजय राठोड व आमदार, खासदारांच्या यांच्याहस्ते होणार आहे. तसेच झरी जामणी तालुक्यातील रामपुर येथील बहुउद्देशिय केंद्राचे भुमिपुजन जिल्हा परिषद सदस्य, सरपंच यांच्याहस्ते होईल.
या कार्यक्रमास पालकमंत्र्यांसह खासदार, आमदार, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, अमरावती येथील आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त जितेंद्र चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता उपस्थित राहणार आहे.
वागदरा येथे कार्यक्रमाच्या ठिकाणी पीएम जनमन योजनेंतर्गत सलंग्नित इतर विभागाचे योजनेचे स्टॉल लोकांच्या माहितीकरीता लावण्यात येणार आहे. मोरगाव तालुका व वागदरा गावाच्या परिसरातील कोलाम पोडावरील कोलाम लाभार्थ्यांनी कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.