नागपूर :- सेंद्रीय शेती योजनेंतर्गत जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट मर्यादेत पूर्ण करुन राज्यात जिल्हा प्रथम क्रमांकावर राहील या प्रमाणे नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी कृषी विभागाला दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित आत्मा नियामक मंडळाच्या तिमाही आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना कडू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, उपसंचालक अरविंद उपरीकर, शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटांचे प्रतिनिधी तसेच मंडळाचे सदस्य, संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मिशन लाईव्ह हुडप्रमाणे बाधीत गावात सेंद्रीय शेती योजना राबवा. माविम, जिल्हा परिषद व आत्मा यांना उद्दिष्ट वाटून मर्यादेत उद्दिष्ट पूर्ण करा. त्यासाठी बेरोजगार उमेदवारांना प्रशिक्षण द्या. बचत गटाची कार्यशाळा घेवून त्यात हॉटेल मालकांना आमंत्रित करा. यासाठी निधीची आवश्यकता असल्यास ती देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना शेती सोबतच शेतीपूरक पशुपालन व्यवसाय कारावा. पशुधनासाठी उत्कृष्ट चाऱ्याची आवश्यकता असते ते कृषी विभागाने उपलबध करुन द्यावे. सकस आहारामुळे शेतकऱ्यांचे पशुधन सदृढ होऊन दुधाच्या दरडोई उत्पनात वाढ होईल. शेतकऱ्यांनीही पशुधनाचा विस्तार करावा. जिल्हा कृषी महोत्सव 15 ते 21 डिसेंबर या कालावधीत करण्यासाठी आतापासून नियोजन करावे, असेही ते म्हणाले.
भिवापूरी मिरची वाणाचे संवर्धन, फुलांची शेती, स्मार्ट प्रकल्प, कॉटन प्रकल्प, परंपरागत कृषी विकास योजना, कृषी अवजारे व दुरुस्ती केंद्र योजनेबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. तालुकास्तरावर कृषी अवजारे व दुरुस्ती केंद्र स्थापन करा. यामुळे शेतकऱ्यांना जवळच अवजारे दुरुस्ती करुन मिळतील व बेरोजगारांसाठी रोजगाराची निर्मिती होईल. जिल्ह्यात एकातरी बचत गटाने फुलांची शेती करावी. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. आत्मा नियामक मंडळाच्या नव्याने झालेल्या सदस्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. तालुकास्तरावरही मंळडाची स्थापना करा, असेही त्यांनी सांगितले.