– तंबाखू नियंत्रण काळाची गरज
यवतमाळ :- तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांच्या जनजागृतीसाठी दि. ३१ मे हा दिवस दरवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. यावर्षी या दिवसाकरीता जागतिक आरोग्य संघटनेने “तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण” हे घोषवाक्य निवडले आहे. तंबाखू नियंत्रण समुदायाच्या प्रयत्नांमुळे सिगारेटचे प्रमाण गेल्या काही वर्षात कमी झाले असले तरी २०२२ च्या आकडेवारीनुसार जगभरात १३-१५ वर्षे वयोगटातील सरासरी ३० टक्के मुले तंबाखूचे काही प्रकार वापरतात.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम हा केंद्रशासनाचा कार्यक्रम असून जिल्ह्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामध्ये एनएचएमच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविला जात आहे.
तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा उद्देश
या कार्यक्रमाचा उद्देश तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण टाळण्यासाठी सामान्य जनतेमध्ये जनजागृती करणे, संशयीत रुग्णांना वेळेत उपचार करुन कर्करोगापासून वाचविणे, जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालये तंबाखूमुक्त करणे, कोटपा कायद्याचे उल्लंघन न होवु देणे, व्यसनाधिन व्यक्तींना समुपदेशनाच्या माध्यमातून व्यसनमुक्त करणे तसेच वेगवेगळ्या माध्यमातुन मौखिक रुग्ण तपासणी शिबीर आयोजित करणे हा आहे. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा समन्वय समिती, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात तंबाखू मुक्त शासकीय कार्यालय हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
कायद्याचे उल्लंघन केल्यास शिक्षा, दंडाच्या तरतूदी
या कार्यक्रमांतर्गत कोटपा (सिगारेट अॅण्ड अदर टोबॅको प्रोडक्ट अॅक्ट) कायद्याची विविध विभागांच्या समन्वयाने प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे याकरीता देखील हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कायद्याच्या कलम ४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी उल्लंघन केल्यास २०० रुपये पर्यंत दंड आकारण्याबाबत कायद्यात तरतुद आहे. कलम ५ – तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहीरातीवर बंदी- पहिला गुन्हा असल्यास २ वर्षापर्यंत शिक्षा किंवा १००० रुपये दंड, दुसरा गुन्हा असल्यास पाच वर्षापर्यंत शिक्षा किंवा ५००० रुपये पर्यंत दंड अशी तरतूद आहे. कलम ६ अ- १८ वर्षाखालील व्यक्तींना तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी असून विक्री केल्यास २०० रुपये दंड, ६ ब- शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परीसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी २०० रुपये पर्यंत दंडाची तरतूद आहे.
कलम ७- सर्व तंबाखूजन्य पदार्थाच्या वेस्टनावर (पाकिटावर) ८५ टक्के भागावर निर्देशित धोक्याची सुचना देणे बंधनकारक आहे, अशी सूचना नसल्यास उत्पादकाचा पहिला गुन्हा असेल तर दोन वर्षापर्यंत शिक्षा किंवा ५००० पर्यंत दंड तसेच पुढील गुन्ह्यासाठी ५ वर्षापर्यंत शिक्षा किंवा १०००० रुपये पर्यंत दंड आणि विक्रेत्याचा पहिला गुन्हा असेल तर एक वर्षापर्यंत शिक्षा किंवा रुपये १००० पर्यंत दंड तसेच पुढील गुन्ह्यासाठी २ वर्षापर्यंत शिक्षा किंवा रुपये ३००० पर्यंत दंडाची तरतूद आहे.
तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मौखिक कर्करोग, दातांचे व हिरड्यांचे आजार, दात पडणे, हलणे, तोंडाची दुर्घंधी, फुप्फुसांचे आजार, गळ्याचा कर्करोग, नपुसंकता, कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, मतीमंद बाळ जन्माला येणे, लकवा मारणे, उच्च रक्तदाब, हृदयरोग, रोगप्रतिकार शक्ती कमी होणे असे विविध आजार जडतात. भारतामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामध्ये सामान्यतः धुररहित – गुटखा, पान मसाला, मावा, साधा तंबाखू, मंजन, पेस्ट, मशेरी, खैनी, खर्रा, जर्दा, तपकीर तसेच धुम्रपान – सिगारेट, बिडी, हुक्का, ई सिगारेट आदी प्रकारांचा समावेश यातून सेकन्ड हॅन्ड स्मोकिंगचा पण धोका होतो.
सेकण्ड हॅण्ड स्मोकिंग म्हणजे काय ?
जी व्यक्ती धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात असते त्या व्यक्तीस धुम्रपान करणाऱ्याला जे धोके असतात तेवढेच धोके असतात, यालाच सेकन्ड हॅन्ड स्मोकिंग असे म्हणतात. तंबाखूमध्ये निकोटीन हे एक सर्वात घातक व व्यसनाला कारणीभुत ठरणारे रसायन आहे. त्या व्यक्तीरिक्त ४००० प्रकारचे विषारी रसायणे तंबाखूमध्ये आढळुन आले आहे. हे रसायने विविध असंसर्गजन्य आजाराकरीता जसे उच्च रक्तदाब, स्ट्रोक, कॅन्सरकरिता कारणीभुत असतात.
भारतात झालेल्या सर्वेनुसार ६० लक्ष लोक तंबाखूच्या सेवनापासून मरण पावतात आणि हे असेच चालत राहीले तर २०३० पर्यंत ८० लक्ष लोक तंबाखूच्या सेवनाने होणाऱ्या आजारामुळे मरण पावतील, असे भाकीत जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.
अब्जावधी डॉलर्सची कमाई करत राहण्यासाठी, तंबाखू उद्योगाला दरवर्षी मरण पावणाऱ्या आणि तंबाखू सोडणाऱ्या लाखो ग्राहकांची जागा घेण्याची गरज आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ती उत्पादने उपलब्ध आणि परवडणारी आहेत याची खात्री करण्यासाठी शिथील नियमनासह, पुढील पिढीमध्ये त्यांच्या उत्पादनांच्या वापरास प्रोत्साहन देणारे वातावरण तयार करण्यासाठी कार्य करते. इंडस्ट्री सोशल मीडिया आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मद्वारे मुलांना आणि किशोरांना आकर्षित करणारी उत्पादने आणि जाहीरातींची युक्ती विकसित करते. या सर्व दुष्परिणामाची जनजागृती करण्यासाठी जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम महिनाभर विविध उपक्रमामार्फत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.