– नोडल अधिकारी सम्राट राही यांनी घेतला आढावा
नागपूर :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील आदिवासीबहुल जिल्ह्यात माहिती, शिक्षण आणि संवादासाठी सुरु झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून योजनांची माहिती देत अधिकाधिक नागरिकांपर्यंत लाभ पोहोचवा, असे निर्देश नागपूर जिल्ह्याचे नोडल अधिकारी सम्राट राही यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विकसित भारत संकल्प यात्रेच्या नियोजनाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, जिल्ह्यातील सर्व विभागांचे विभागप्रमुख प्रत्यक्ष तर उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
शासनाच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत या यात्रेदरम्यान देण्यात येणार आहे. सर्व विभागांनी आपल्या विभागाच्या योजनांची माहिती यात्रेदरम्यान ग्रामस्थांना द्यावी. या यात्रेदरम्यान केंद्र व शासनाच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा, उज्ज्वला, मुद्रा, किसान सन्मान, जनधन योजनेसह वनहक्क, महसूल विभागाची स्वामित्व योजना, एकलव्य योजना, आयुष्मान कार्डची माहिती देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम केंद्र सरकारकडून सुरू करण्यात येत आहे. तिचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात जनजाती गौरव दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले होते.