नागपूर :- एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय आणि लता मंगेशकर हॉस्पिटलचे बधिरीकरण (ऍनेस्थेसियॉंलॉजी) विभाग तसेच इंडियन सोसायटी ऑफ ऍनेस्थेसियॉंलॉजिस्ट, नागपूर शहर शाखा (ISA-NCB) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय आणि लता मंगेशकर हॉस्पिटल, हिंगणा रोड, नागपूर येथे ‘पॉइंट ऑफ केअर अल्ट्रासाऊंड (POCUS)- मास्टरक्लास आणि कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. काजल मित्रा (अधिष्ठाता, एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय) यांच्या हस्ते तसेच डॉ. मोहना मजुमदार (संचालिक, सामान्य प्रशासन) आणि डॉ. मधुर गुप्ता (संचालिक, एमईटी सेल) यांच्या उपस्थितीत झाले. डॉ. अमित दीक्षित, डॉ. विनायक देसुरकर, डॉ. रश्मी शिंगाडे (अध्यक्ष, ISANCB) आणि डॉ. देवयानी ठाकूर (सचिव, ISANCB) यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. काजल मित्रा यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि ऑपरेशन थिएटर आणि क्रिटिकल केअरमध्ये रुग्णांची तब्येत सुधारण्यासाठी अल्ट्रासाऊंडचे मूलभूत महत्व आणि प्रामुख्याने POCUS चा वापर करण्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.
डॉ. अमित दीक्षित, डॉ. विनायक देसुरकर, डॉ. हर्षल वाघ, डॉ. दीपक बोर्डे, डॉ. प्रदीप डिकोस्टा, डॉ. रोमा सराफ, डॉ. सचिन अर्भी, डॉ. उपेंद्र कापसे, डॉ. राजेंद्र पांढरे यांनी विविध संवादात्मक सत्रे आयोजित केली आणि मास्टर सत्रादरम्यान प्रभावी रुग्णसेवा देण्यासाठी POCUS ची डोक्यापासून पायाच्या टाचेपर्यंत उपयोगिता दाखविली.
क्लिनिकल स्किल लॅबमध्ये दुपारच्या सत्रात हँड्स ऑन ट्रेनिंग कार्यशाळा घेण्यात आली. विविध परिस्थितीत POCUS ची उपयोगिता सिध्द करून दाखविण्यात आली. मास्टरक्लास आणि कार्यशाळेत एकूण 70 प्रतिनिधी उपस्थित होते.
वेगवेगळ्या पेरीऑपरेटिव्ह परिस्थितींमध्ये रुग्णांचे सुधारित परिणाम मिळावे म्हणून उच्चशिक्षित बधिरीकरण तज्ञांद्वारे POCUS चा वापर करून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
बधिरीकरण विभागाच्या प्रा. डॉ. अंजली भुरे (विभाग प्रमुख) यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ. हिना पाहुजा या समन्वयक होत्या. डॉ. नेहारिका बारीक आणि डॉ. अजित ज्योतिपुरार यांनी अतिशय कुशलतेने कार्यक्रमाचे संचलन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय आणि लता मंगेशकर हॉस्पिटलच्या संपूर्ण बधिरीकरण विभागाने अथक परिश्रम घेतले.