नागपूर :- राजमुद्रा क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आमदार श्री. प्रवीण दटके यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘नमो आमदार चषक २०२४’मधील कबड्डी स्पर्धेत मराठा लॉन्सर्स नागपूर संघाने महिला व पुरूष गटात दुहेरी विजेतेपद पटकाविले.
चिटणीस पार्क येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये पुरुष गटात मराठा लॉन्सर्स नागपूर संघाने जय मातृभूमी उमरेड संघाचा 29-20 अशा गुणांनी पराभव करीत बाजी मारली. या गटात ओम अमर क्रीडा मंडळ नागपूर संघाने तिसरे स्थान प्राप्त केले.
महिला गटात मराठा लॉन्सर्स नागपूर संघाने रेंज पोलिस नागपूर संघाचा 33-15 ने पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. त्रिरत्न कामठी संघाने तिसरे स्थान पटकावले. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत क्षीतिजा साखरकर बेस्ट कॅचर तर साक्षी त्रिवेदी बेस्ट रायडर ठरली.
बक्षीस वितरण प्रसंगी नागपूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मदन रतन, डॉ. पीयूष आंबुलकर, सचिन नाईक, विवेक अवसरे, अनिल गुळगुळे, डॉ. विवेक शाहू उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन हंबीरराव मोहिते यांनी केले.
२१ आणि २२ फेब्रुवारीला पुरूष व महिला गटातील खो-खो अजिंक्यपद स्पर्धा होणार आहेत.