शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांसह तांत्रिक ज्ञानाला प्रोत्साहन द्यावे – अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांचे प्रतिपादन

– मनपाच्या शिक्षणोत्सव २०२३-२४ कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद

नागपूर :- प्राथमिक स्तरावरील मुलामुलींना सुसंस्कृत बनविण्याचे काम आईवडीलानंतर शिक्षकांचे असते. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी काही सुप्त गुण असतात. ते निरखून शिक्षकांनी त्यांना घडवायचे असते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासोबतच सध्याच्या युगात आवश्यक अशा तांत्रिक ज्ञानाला देखील प्रोत्साहन द्यायला हवे असे प्रतिपादन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केले.

नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या नवचेतना उपक्रमांतर्गत “शिक्षणोत्सव २०२३-२४” कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार (ता.२०) गणेशपेठ येथील मनपाच्या अध्यापक भवन येथे करण्यात आले. शिक्षणोत्सवाचे उद्घाटन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या हस्ते करण्यात आले.

नवचेतना उपक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या सर्वच शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी मनपाच्या शिक्षणाधिकारी साधना सायम, मनपाचे जनसंपर्क अधिकारी  मनीष सोनी, आकांक्षा फाउंडेशनच्या जयश्री ओबेरॉय, मनपाचे सहायक शिक्षणाधिकारी संजय दिघोरे,  राजेंद्र सुके, नागपूर महानगरपालिका शिक्षक संघाचे सचिव देवराव मांडवकर यांच्यासाह मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन करीत मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल सांगितले की, विद्यार्थ्यांच्या अंगी अनेक सुप्त गुण असतात, त्या सुप्त गुणांना ओळखून त्याचे योग्यरित्या मार्गदर्शन करीत त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य शिक्षकांचे आहे. सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची आवश्यकता असते. स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकायला मिळतात, त्यांचा आत्मविश्वास वाढतो, जिंकण्याची जिद्द निर्माण होते, त्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत मिळते, अशात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी तयार करायला हवे, आम्ही करू शकतो असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण करण्याची आवश्यकता आहे. “यश मिळेल की अपयश” हे आपल्या प्रयत्नावर अवलंबून असते, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रयत्न करण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहित करायला हवे. असेही  आंचल गोयल यांनी सांगितले.

याशिवाय सध्या विविध शाळांमध्ये विद्यार्थी तंत्रज्ञानावर भर देताना दिसून येतात, अनेकांना मोबाईल वर ॲप डेव्हलपमेंट सारख्या तंत्रज्ञानाची माहिती आहे, त्यात आवड देखील आहे, अशात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अवगत असलेल्या तांत्रिक ज्ञानाबद्दल त्यांना योग्य मार्गदर्शन करावे असे आवाहनही  गोयल यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी साधना सयाम यांनी केले. त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे, त्यांचा बौद्धिक विकासासह त्यांचे योग्य व्यक्तिमत्व घडावे याकडे नेहमीच मनपाच्या शिक्षकांचे लक्ष असते. मनपाच्या शाळेत देखील अनेक हिरे आहेत, या हिऱ्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास ते आणखी चमकतील. अशा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा एक हक्काचे व्यासपीठ मिळेल. त्यामुळे अशा प्रकारच्या स्पर्धा मनपा घेत राहील असेही त्या म्हणाल्या. मनपाने घेतलेल्या शिक्षणोत्सव सारख्या कार्यक्रमातून राज्य शासनाच्या “माझी शाळा, सुंदर शाळा” उपक्रमात देखील मनपाचे विद्यार्थी उत्तम कामगिरी करतील आणि मनपाच्या शाळा क्रमवारीत अव्वल स्थानी पटकवतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमात राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होत जेतेपद मिळवलेल्या मनपा शाळांच्या खेळाडूंचा आणि शिक्षणोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यात प्रियदर्शिनी मराठी उच्च प्राथमिक शाळेचा खो-खो संघ कर्णधार अंश भगत, राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झालेल्या एम. ए. के आझाद माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी सरफराज शेख, राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेची विजेती मनपा नेताजी मार्केट माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी सानिया शेख, राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत यश संपादन करणारा संजयनगर हिंदी माध्यमिक विद्यालय संघ, वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आलेले डॉ. आंबेडकर माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी तेजस्विनी हटकर, चित्रकला स्पर्धेत प्रथम आलेले विवेकानंद नगर हिंदी मध्यामिक शाळेचे विद्यार्थी भुवन साहू, पुस्तक परिचय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावले स्व. साखळे गुरुजी उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी महिमा बेलवंशी यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम दुर्गानगर प्राथमिक शाळेचे संगीत शिक्षक प्रकाश कालासिया व विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रतिभा लोखंडे यांनी केले. तर यशस्वीतेसाठी कीर्ती गणवीर,  सुभाष उपासे, विजय वालदे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले. सहायक शिक्षण अधिकारी राजेंद्र सुके यांनी आभार व्यक्ती केले.

विद्यार्थ्यांच्या नृत्याविष्काराने जिंकले प्रेक्षकांचे मन

शिक्षणोत्सव अंतगर्त नृत्य आणि नाट्याची स्पर्धा घेण्यात आली. यावेळी विविध नृत्यांवर विद्यार्थी थिरकले. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या नृत्याविष्कार सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाल्याचे दिसून आले. नृत्य स्पर्धेत विद्यार्थीनीं शेतकरी नृत्य, कोळीनृत्य, गोंधळ, छत्तीसगढी नृत्य, गोंडी नृत्य आदि नृत्य सादर केले. नृत्य आणि नाट्याच्या परिक्षकांची जबाबदारी डॉ. रविंद्र भुसारी आणि वैदेही चौरे यांनी पार पडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

Wed Feb 21 , 2024
– ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाने रेडीओच्या इतिहासातील सुवर्णअध्याय संपला – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली – रेडिओच्या आवाजाचा अनभिषिक्त सम्राट हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार* *भारतीय कला, सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी – उपमुख्यमंत्री अजित पवार* मुंबई :- “रेडिओच्या आवाजाचा अनभिषिक्त सम्राट, ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाने भारतीय रेडिओच्या सांगितिक इतिहासातील सोनेरी अध्याय संपला आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com