यवतमाळ :- सोयाबीन पिकावर विषाणूजन्य पिवळा मोझॅइक रोगाचा दरवर्षी कमीअधिक प्रमाणत प्रादुर्भाव दिसून येतो. असा प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतकऱ्यांनी उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पिवळा मोझॅइकची लक्षणे : रोगाच्या सुरुवातीला पानावर पिवळ्या रंगाचे छोटे-छोटे चट्टे दिसतात, त्यानंतर पानावर चमकदार पिवळ्या हिरव्या रंगाचे मोठ्या आकारचे चट्टे दिसतात व पाने पिवळ्या रंगात बदलतात. झाडे खुरटी व खुजी राहतात. रोगग्रस्त झाडाला फुलोरा उशिरा येतो व या फुलोऱ्यास जास्त शेंगा लागत नाही. रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः रोगग्रस्त बियाण्याद्वारे व दुय्यम प्रसार हा पांढऱ्या माशीद्वारे होतो.
रोगग्रस्त झाडांची वाढ खुंटलेली दिसते. पाने आखुड, लहान, जाडसर, सुरकुतलेली होतात व पानाच्या कडा खालच्या बाजूने दुमडतात. पानामध्ये अत्याधिक हिरवेपणा दिसतो. पानाचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. रोगग्रस्त झाडाला फुलोरा उशिरा येतो व या फुलोऱ्यास जास्त शेंगा लागत नाही. रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास बियाण्याच्या आवरणाचा रंग बदलून करडा तपकिरी काळपट होतो. या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः रोगग्रस्त बियाण्याद्वारे होतो व दुय्यम प्रसार हा मावा किडीद्वारे होते.
प्रतिबंधात्मक उपाययोजना : सुरूवातीसच रोगग्रस्त झाडे आढळल्यास शेताबाहेर काढून नष्ट करावीत. पिकामधील व बांधावरील तण नियंत्रण करणे आवश्यक आहे. नियंत्रणाच्या उपाययोजना : पांढरी माशी व मावा किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतात पिवळे चिकट सापळे १५ x ३० सेमी आकाराचे एकरी २०-२५ या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या समकक्ष उंचीवर लावावेत.
रोग, किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच रासायनीक किटकनाशकाची फवारणी करावी. इमीडाक्लोप्रीड १७.८ एसएल २.५ मिली किंवा फ्लोनिकॅमिड ५० टक्के डब्लुजी २ ग्रॅम किंवा थायोमिथोक्झाम २५ टक्के डब्ल्युजी ३ ग्रॅम किंवा अॅसिटामिप्रिड २५ टक्के अधिक बायफेन्थ्रीन २५ डब्लुजी ५ ग्रॅम यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरज वाटल्यास १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. फवारणी करतांना किटकनाशके आलटून पालटून वापरावीत, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.