यवतमाळ :- यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे तूरीचे पिक चांगले आहे. हे पिक कायीक वाढीच्या अवस्थेत आहे. लवकरच पिक फुलोरा अवस्थेत येईल. मात्र सद्यस्थितीत काही शेतकऱ्यांच्या शेतामधे तुरीच्या शेंड्यावरील पाने जाळे विणुन गुंडाळणारी अळी दिसुन आली आहे. फुले धरण्याच्या अवस्थेत ही मारूका अळी फुलांचे तसेच शेंगांचे नुकसान करते. वेळीच या अळीचे व्यवस्थापनाचे करणे आवशक आहे.
मारुका ही कडधान्य पिकावरील पाने गुंडाळणारी व शेंगा पोखरणारी किड आहे. या किडीचा पतंग करड्या रंगाचा असून मागील पंखावर पांढरे पट्टे आढळून येतात. मादी पतंग कळ्या, फुले व शेंगावर अंडी घालतात. अळी पांढुरक्या रंगाची व अर्धपारदर्शक असते. तिब्या पाठीवर काळ्या रंगाच्या सहा ठिपक्यांच्या जोड्या असतात. अंड्यातून निघालेली अळी कळ्या, फुले व शेंगाना एकत्रित करून जाळ्याने चिटकवून झुपके तयार करून त्या आतमध्ये राहून कळ्या, फुले खाते. तिसऱ्या व चौथ्या अवस्थेतील अळी शेंगा पोखरून आतील दाणे खाते. अळी शेंगांच्या झुपक्यात किंवा मातीमध्ये कोपावस्थेत जाते.
या किडीचा जीवनक्रम १८ ते ३५ दिवसात पूर्ण होतो. किडीच्या व्यवस्थापनासाठी जिथे तुर पिक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत, तेथे सर्वेक्षण करून शेतात २० ते २५ ठिकाणी प्रती मीटर ओळीत पाहणी करावी. किडीचा प्रादुर्भाव सरासरी २ ते ३ अळ्या प्रती मीटर ओळीच्या अंतरात दिसुन आल्यास गरजेनुसार खालीलपैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी.
फ्लूबेंडानाईड २० डब्ल्युजी ६ ग्रॅम किंवा थायोडीकार्य ७५ डब्ल्युपी २० ग्रॅम किंवा नोवालूरोन ५.२५ इंडोक्साकार्ब ४.५० एससी १६ मिली यांची १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करवी. यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पावरस्प्रेने फवारणी करावयाची असल्यास किटकनाशकाची मात्रा तिप्पट करावी. गरज भासल्यास १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. दुसऱ्या फवारणीच्या वेळेस किटकनाशकांची अदलाबदल करावी. या किटकनाशकांसोबत इतर किटकनाशके, बुरशीनाशके, संप्रेरके, खते, अन्नद्रव्ये इत्यादी मिसळू नये, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.