मुंबई :- ग्रामीण भागातील कुपोषण कमी करण्यासाठी राज्य शासन पोषण आहार योजना राबवते. त्याच प्रमाणे आता शहरी भागातील कुपोषण कमी करण्यासाठी शहरातील मुलांनाही पोषण आहार योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज विधानपरिषदेमध्ये दिली.
सदस्य चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री तटकरे बोलत होत्या.
देशात कुपोषीत माता आणि कुपोषीत बालक यांना चौरस आहार मिळावा यासाठी केंद्र शासनातर्फे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबवण्यात येत असल्याचे सांगून मंत्री तटकरे म्हणाल्या की, अदिवासी भागातील कुपोषण यामुळे कमी झाले आहे. या चौरस आहाराच्या निधीमध्ये वाढ करण्यासाठी अदिवासी विकास विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल. तसेच राज्यातील प्रत्येक गरोदर माता, बालक, स्तनदा माता यांना चौरस आहार मिळावा ही शासनाची भूमिका आहे. चौरस आहारामध्ये पुरवण्यात येणाऱ्या आहाराची वेळोवेळी तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये त्या आहारात काही त्रृटी आढळल्यास तो परत पाठवला जातो. तसेच कुपोषीत बालक, माता यांना पुरक आहारही पुरवण्यात येतो अशी माहिती मंत्री तटकरे यांनी सभागृहात दिली.