योगाला आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवा – राज्यपाल रमेश बैस

मुंबई :- “सप्टेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभर साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता देत २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा होत आहे. त्यामुळे आपला योग जगात पोहोचला. प्रत्येकाला निरोगी आयुष्य जगायचे असेल, तर योगाला आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनविले पाहिजे”, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केले.             विधानभवन प्रांगणात ‘योगप्रभात @ विधानभवन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाप्रसंगी राज्यपाल आपले विचार व्यक्त करीत होते. कार्यक्रमाला व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार मनीषा कायंदे, आमदार संजय कुटे, आमदार विक्रम काळे आदी उपस्थित होते.

योगामुळे आत्मविश्वास, सहनशक्ती वाढीस लागत असल्याचे सांगत राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, योगाचा संपूर्ण जगात प्रचार झाला पाहिजे, नव्या पिढीला योग शिकविणे, ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आत्म्याला परमात्म्याशी जोडण्याचे सामर्थ्य योगात आहे. देशात मधुमेह आजार वेगाने वाढत आहे. या आजारावर योगाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवणे शक्य आहे. सर्वाधिक युवाशक्तीचा भारत देश आहे. युवाशक्तीने योग केला पाहिजे. ही योग चळवळ पुढे नेली पाहिजे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या युवकांना योगामुळे व्यसनांपासून दूर राहता येऊ शकते. देशात योग विद्यापीठ होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. तणावमुक्तीसाठी प्रत्यके कार्यालयात किमान १५ मिनिटे योगाभ्यास झाला पाहिजे”.

योग करून निरोगी राहूया, करो योग रहो निरोग – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

“संपूर्ण जगात आंतराष्ट्रीय योग दिवस म्हणून २१ जून हा दिवस साजरा केला जातो. आजचा दिवस निरंतर स्मरणात ठेवावा, असा दिवस आहे. शरीर, मनाच्या आरोग्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. बदलत्या जीवनशैलीत योगाला आपलेसे करून निरोगी आयुष्य जगावे. त्यासाठी प्रत्येकाने निरोगी राहण्यासाठी योग करावा. करो योग रहो निरोग हा मंत्र अंगीकारावा”, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात केले.

निरोगी भारतासाठी प्रत्येकाने योग करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

“प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मोदी यांच्या प्रयत्नांनी संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले व संपूर्ण जगात योग पोहोचला. योग ही प्राचीन चिकित्सापद्धत आहे. निरोगी राहण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने योगशास्त्र तयार करण्यात आले. निरोगी भारताच्यानिर्माणासाठी प्रत्येकाने योग करावा”, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवन येथील योगप्रभात कार्यक्रमात केले.

रोग होऊच नये म्हणून योगशास्त्र प्रभावी उपाय असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की सध्याच्या जीवनात ताण-तणावांचा सामना करताना अनेक ‘लाइफ स्टाईल’ आजार बळावत आहेत. या आजारांचा सामना करण्यासाठी योगशास्त्र त्यावर प्रभावी उपाय आहे.

यानंतर योग प्रात्यक्षिक करण्यात आले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे संचालन निलेश मदाने यांनी केले. कार्यक्रमाला विधानभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच योगप्रेमी उपस्थित होते.

शतकी परंपरा असलेल्या कैवल्य धाम, मुंबई संस्थेच्यावतीने योग प्रात्यक्षिके करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

योगसाधना ही लोक चळवळ व्हावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Wed Jun 21 , 2023
मुंबई :- “बदलती जीवनशैली, ताण-तणाव यावर मात करण्यासाठी योग आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकांनी योग अंगीकारत योगसाधनेला लोक चळवळ बनवावी”, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.            वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय,ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय,मुंबई बंदर प्राधिकरण पतंजली योग समिती मुंबई,भारत खाद्य निगम ईसीजीसी लि.सीप्झ-सेझ मुंबई, सीआयसीएफ, यांच्या संयुक्त विद्यमाने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com