नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने तसेच नवनिर्माण मांगगारोडी समाज बहुउद्देशीय संस्था यांच्या सहकार्याने हनुमान नगर झोन येथील राहाटे टोली (रामटेके नगर) येथे नवीन नागरी आरोग्य वर्धिणी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या हस्ते या केंद्राचे बुधवार (ता. १९) रोजी लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. बकुल पांडे, हनुमान नगर झोनचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या संस्थापिका लीना बुधे, नवनिर्माण मांगगारोडी समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मंगल अण्णाजी लोंढे, उपाध्यक्ष नितीन जयसिंग नाडे,रुपेश लोंढे, बळीराम उफाडे, नीरज शेंडे, गंगाराम मानकर, दिनेश मानकर, बन्सी मानकर, कैलास लोंढे, सुजित लोंढे, कुंदन शेंडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
मनपाच्या हनुमान नगर झोन अंतर्गत येणाऱ्या राहाटे टोली (रामटेके नगर) येथील या नवीन नागरी आरोग्य वर्धिणी केंद्रात सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा नागरिकांना पुरविण्यात येणार आहेत. यात माता बाल संगोपन, गरोदर स्त्रियांची आरोग्य तपासणी, बालकांचे लसीकरण, गर्भनिरोधक वितरण, कुटुंब नियोजन समुपदेशन, आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.