भंडारा :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकार तुष्टीकरणासाठी नव्हे तर 140 कोटी जनतेच्या संतुष्टीसाठी झटत आहे असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भंडारा-गोंदिया येथे केले. महायुतीचे उमेदवार – भारतीय जनता पार्टीचे खा.सुनील मेंढे यांच्या प्रचार सभेत योगी आदित्यनाथ बोलत होते. विकसित भारत आणि विकसित भंडारा-गोंदिया साठी पुन्हा एकदा मोदी सरकार आणि महायुतीचे मेंढे यांच्या विजया शिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही असे ही ते म्हणाले. सोमवारी भंडारा इथे झालेल्या प्रचार सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा.प्रफुल्ल पटेल, महायुतीचे उमेदवार खा.सुनील मेंढे, माजी मंत्री परिणय फुके, जयदीप कवाडे आदी उपस्थित होते. गरीब, महिला, शेतकरी आणि युवा कल्याणासाठी विविध योजना राबवून एनडीए सरकार बलशाली भारत निर्माण करत आहे त्याला साथ देण्यासाठी मेंढे यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
योगी आदित्यनाथ म्हणाले की मागच्या 10 वर्षांत मोदी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार केले आहे. दहशतवादाचा बिमोड करून देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य एनडीए सरकारने दिले. मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कुणाही समोर न झुकता अविरत विकास कार्य करून जगाच्या पटलावर आपल्या देशाची प्रतिमा उज्वल केली आहे. भारताची अर्थव्यवस्था जगात तिस-या स्थानी न्यावयाची असेल तर पुन्हा तिस-यांदा मोदी सरकारला विजयी करा असेही ते म्हणाले.