‘मेयो’ व ‘मेडिकल’ मधील अद्ययावतीकरणाच्या कामांची गुणवत्ता राखत गती द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– ‘मेयो’ आणि ‘मेडिकल’च्या विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करून घेतला आढावा

– कालमर्यादेत गुणवत्तापूर्ण प्रकल्पपूर्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॅार रूम

– एप्रिल महिन्यात पुन्हा घेण्यात येणार आढावा

 नागपूर :- शहरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे रुग्णांची संख्या व रुग्णालयाप्रती विश्वासार्हता अधिक आहे. येथील वैद्यकीय सेवा सुविधा वाढाव्यात व अधिकाधिक गरजू रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये निधी येथील कामांना उपलब्ध करून दिला आहे. ही कामे दिलेल्या कालमर्यादेत व आराखड्यानुसार पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) ला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विकास कामाचा आढावा घेतला.

यावेळी आ. प्रवीण दटके, आ. मोहन मते, आ. आशीष देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे, महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, , वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण, डॉ. राज गजभिये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

देखरेखीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॅार रूम

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) प्रगतिपथावरील कामे, सद्यस्थिती, अडी-अडचणी, कामाची गुणवत्ता यावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॅार रूम स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिका-यांना यावेळी दिले.

सौर ऊर्जेवर भर द्या

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) यांना लागणा-या वीजेची गरज ही सौर ऊर्जेच्या माध्यमातून भागविली पाहिजे. संपूर्ण कॅम्पस परिसर हा सौर ऊर्जेवर असावा , यावर भर देण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

जुनी कामे पूर्ण केल्यावरच नवीन सुरू करा

मेडिकल आणि मेयोमधील सध्याची प्रस्तावित कामे पूर्ण करावी. त्यानंतरच नवीन कामे सुरू करावीत. यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. मेडिकल व मेयोमध्ये अधिकाधिक झाडे लावण्यावर भर देण्यात यावा, असेही ते पुढे म्हणाले. मेडिकल व मेयोमध्ये उभारण्यात येणा-या सर्व इमारतींच्या प्रसाधनगृहांची देखभाल ही योग्य प्रकारे व्हावी यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

एप्रिल महिन्यात घेण्यात येणार आढावा

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील सुरू असलेली कामे दिशानिर्देशानंतर किती पूर्ण झाली याचा आढावा एप्रिल महिन्यात पुन्हा घेण्यात येणार आहे. यावेळी कामाच्या सद्यस्थितीची माहिती प्राधान्याने घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सिवनी (घोटमुंढरी) येथे सद्गुरु साधना सदन सेवाश्रम या चार दिवसीय कार्यक्रमाच्या आज समारोप 

Sun Jan 12 , 2025
अरोली :- खात रेवराल जि प, गट ग्रामपंचायत घोटमुंढरी अंतर्गत येणाऱ्या सिवनी (घोटमुंढरी) येथील सद्गुरु साधना सदन सेवाश्रम येथे श्री त्रीपिंडेश्वर भगवान, अनंत श्री स्वामी अखंडानंद सरस्वतीजी महाराज, श्री श्री 1008 अनंत विद्या विभूषित स्वामी बासू जी महाराज यांच्या कृपेने एकाविंशती (२१) वार्षिक उत्सव निमित्त या आठ जानेवारीपासून सुरू असलेल्या चार दिवसीय कार्यक्रमाच्या नियोजित कार्यक्रमानुसार 11 जानेवारी शनिवारला सकाळी घोटमुंढरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!